महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची – मंत्री छगन भुजबळ

राज्यातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

मुंबई, दि. 10 : कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील आरोग्य विभागासोबतच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी कामाचा वेग वाढवून अन्नधान्याचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील अन्न, नागरी पुरवठा विभागाचा आढावा घेण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी राज्यशासनाचे नोडल अधिकारी व प्रधान सचिव महेश पाठक, अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे, मुंबईचे शिधा वाटप नियंत्रक कैलास पगारे, सहसचिव सतीश सुपे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, उपनियंत्रक यांच्याशी श्री. भुजबळ यांनी संवाद साधला.

श्री. छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ योजनेतील वाटप, राज्यशासनाकडून केशरी कार्ड धारकांबाबत घेण्यात आलेले निर्णय, याबाबत आढावा घेतला. त्याचबरोबर धान्यवाटप करताना येणाऱ्या अडी-अडचणी लक्षात घेऊन याबाबतही मार्गदर्शन केले.

श्री.भुजबळ म्हणाले, स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व पात्र शिधापत्रिकाधारक यांना धान्य मिळेल याची दक्षता घ्यावी. ज्या शिधापत्रिकांची अडचण POS मशिनसंबंधी अथवा सदस्याच्या आधार सिडींग/प्रमाणिकरणाबाबत आहे अशा शिधापत्रिकाधारकांना धान्य योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांची आहे. काही स्वस्त धान्य दुकानदारांबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. यात विशेषतः अधिक दराने धान्य वितरीत करणे, देय असलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य वितरित करणे तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांनी दुकान बंद ठेवणे इत्यादी तक्रारी प्राप्त झाल्या असून काही मोबाईल चित्रीकरणाद्वारे याबाबी समाजमाध्यमात पसरत आहेत. अशा घटनांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत किराणा दुकानातून दिल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू चढ्याभावाने विकल्या जाऊन जनतेची पिळवणूक होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेऊन सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना स्वस्त धान्य वितरणाबाबत संयुक्तिक कार्यपद्धती ठरवून द्यावी.

श्री.भुजबळ म्हणाले, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना दुकानाबाहेर ठळकपणे दिसेल असा माहितीचा फलक लावण्याचे निर्देश द्यावेत. यात प्रामुख्याने कोणत्या शिधापत्रिकाधारकांना किती प्रमाणात व काय दराने धान्य मिळेल याची स्वयंस्पष्ट माहिती असावी जेणेकरून नागरिकांना त्याची माहिती होऊन अधिक पारदर्शकता येईल. बरेच स्वस्त धान्य दुकानदार हे धान्य वितरण करताना ‘सोशल डिस्टसिंग’ चे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत त्यांना सूचना देण्यात येऊन त्याचे काटेकोरपणे पालन करावे.

शासनाने मंजूर केलेल्या धान्याची उचल मुदतीत करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी धान्याची वाहतूक, साठवणूक व वितरण करणाऱ्या सर्व यंत्रणांशी योग्य समन्वय ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन कालावधीत मिलिंग प्रोसेस मंदावता कामा नये. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. शासनाने शिवभोजन योजनेची व्याप्ती आता मुंबई शहर आणि जिल्हा मुख्यालयातून तालुक्यांपर्यंत वाढवलेली आहे. आता सद्यस्थितीत एक लाख थाळी प्रतिदिन उद्दिष्ट शासनाने निश्चित केलेले आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व शिवभोजन केंद्रांवर पुरविण्यात येत असलेल्या अन्नाच्या दर्जाबाबत कार्यक्षमपणे पर्यवेक्षण करावे. पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून काम करत असल्याबद्दल श्री. भुजबळ यांनी सर्वांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांनी एकूण उद्दिष्टाच्या 80 टक्केपेक्षा अधिकचे धान्य वाटप केले त्या जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!