दिवा : ठाणे मनपाच्या दाटीवाटीचा परिसर असलेल्या दिवा भागात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे . ठाणे शहराच्या जवळ जवळ सर्वच भागात सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्याचे दिसत आहे. कळवा, मुंब्रा पाठोपाठ आता दाट लोकवस्तीच्या असलेल्या दिव्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील हा रुग्ण असून ४ एप्रिलला ताप आल्याने दिव्यातीलच एका खाजगी रुग्णालयात तो उपचारांसाठी गेला होता . त्यांनतर शुक्रवारी त्याची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आली असल्याचे स्पष्ट झाले आहे . त्याच्या कुटुंबातील ४ व्यक्तींची तपासणी देखील सुरु करण्यात आली आहे . त्याच्या कुटुंबातील लोकांना कोरोनाची लागण आहे कि नाही हे रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे . दिव्यात कुठे चाळी तर कुठे इमारती या दाटीवटीने उभ्या आहेत. त्यामुळे त्यामुळे आता येथे खबरदारीचे उपाय करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. यामध्ये तो राहत असलेल्या इमारतीपासून मुंब्रा कॉलनीचा अर्धा भाग सील करण्यात आला असून ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये या व्यक्तीने उपचार घेतले होते ते हॉस्पिटल देखील सील करण्यात आले आहे .
कळवा आणि मुंब्र्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिव्यात आतापर्यंत एकही रुग्ण सापडला नव्हता. दिव्यात छोट्या छोट्या इमारतींबरोबरच अनेक चाळी असल्याने या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे . जवळपास ५ लाखांपेक्षा अधिक या भागाची लोकसंख्या आहे . त्यामुळे जर दिव्याच्या झोपडपट्टी भागात जर कोरोनाने शिरकाव केला तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे कळवा आणि मुंब्र्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून शुक्रवारी खारेगांवमध्ये १ रुग्ण पॉसिटीव्ह सापडला आहे . तर मुंब्र्यात देखील १ रुग्ण पॉसिटीव्ह सापडला असून तो अमृतनगर परिसरातच राहणारा आहे. यापुर्वी कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीचा हा मुलगा असून मुंब्र्यात आता अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे . दुसरीकडे शहरातील ढोकाळी भागात वास्तव्यास असलेल्या तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या वडील आणि त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा वैद्यकीय सेवा देणारा रुग्ण सुरवातीला शहरात सापडलेल्या एका वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्यालाही याची लागण झाल्याची माहिती पालिकेने दिली.कोरोना बाधीतांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. दिवा परिसरातही रुग्ण आढळल्याने आता धोका अधिक वाढला आहे .मुंब्र्यात १५ तर कळव्यात १३ कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या झाली असून ठाणे शहरात शनिवारपर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा ४४ वर जाऊन पोचला आहे .
दिव्यात सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण !
