महाराष्ट्र

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबईसाठी स्वतंत्र समिती

मुंबई, दि. १४: कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात व मुंबई परिसरात ज्या रुग्णालयात कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या रुग्णालयाच्या प्रमुखाला संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठविणे तसेच समितीसमोर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. असे पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविले आहे.

मुंबई शहर व परिसरात कोरोनाची विषाणूबाधा व मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना व विश्लेषण करण्याकरिता सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या ममृत्यूच्या कारणांचे विश्लेषण आणि त्यानुसार मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचविणार आहे. त्याचबरोबर कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना आवश्यक त्या तयारीसाठी मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.

मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे असून के. ई.एम. रुग्णालयाचे औषधी वैद्यक शास्त्र प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर, सायन रुग्णालयाचे अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णीक, जे.जे. रुग्णालयाचे कम्युनिटी मेडीसीनचे प्रा.डॉ. छाया राजगुरू, जे.जे. रुग्णालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या नागर, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे समितीच्या सदस्य सचिव आहेत.

मुंबई वगळून उर्वरित राज्य असे कार्यक्षेत्र असलेल्या या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या समितीत माजी आरोग्य संचालक डॉ. पी.पी. डोके, औषधी वैद्यक शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. एल. काकराणी व डॉ. दिलीप कदम, पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ.शशीकला सांगळे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!