अंबरनाथचे उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांचा ५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मदत करण्याचा मानस
अंबरनाथ दि. १५ (नवाज अब्दुलसत्तार वणू) जगभरात पसरत चाललेल्या कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता “कोरोना”चा संसर्ग टाळण्यासाठी व सर्व समाजाचे हित राखण्यासाठी सरकारच्या संपूर्ण संचारबंदी मुळे आज हातावरती पोट असलेले हजारो नागरिक संकटात सापडले आहेत. “काम नाही, तर पैसा नाही, मंग जगायचे कसे” हा प्रश्न त्यांच्यासमोर असून त्यांना मदत करण्यासाठी सर्व लोक आपापल्या परीने प्रयत्न करतच आहेत, अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर, जुना भेंडीपाडा, शास्त्रीनगर, गांधीनगर, सिद्धार्थनगर, भगतसिंह नगर, कैलाशनगर असा हा कामगार बहुल परिसर असून याठिकाणी घरकाम करणारे, सफाई कामगार, रोजंदारीवर काम करणारे कामगार, विविध छोटे कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार आणि फेरीवर धंदा करणारे गरीब कष्टकरी वर्ग राहतो. “शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण” या धोरणानुसार पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे व आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सहयोगाने सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त गोरगरीब गरजू नागरिकांना त्यांच्या घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्याचा अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अब्दुलभाई शेख यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. गरजू लोकांना मदद करताना त्यांचे फोटो काढायचे नाही असे त्यांनी ठरविल्याचेही शेख यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सदर जीवनावश्यक वस्तूंची मदत आपल्या घरपोच करण्यात येणार आहे, ही मदत करत असताना सोशल डिस्टनसिंगची काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, घरातच रहावे, सुरक्षित रहावे, बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावे, आपले हात स्वच्छ धुवा आणि काळजी घ्या. असेही आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी केले.