परिसरातील गांव – पाड्यांसाठी खोडाळा ग्रामपंचायतीची मागणी
मोखाडा {दीपक गायकवाड} कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तालुक्यात ” शिवभोजन ” थाळीचे प्रयोजन जनसामान्यांच्या हितासाठी सुरू केले आहे . त्याच धर्तीवर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथेही निष्कांचन जनतेचा मोठ्या प्रमाणावरील राबता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी सुरु करण्याची मागणी खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील व उपसरपंच मनोज कदम यांनी जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे केली आहे.
मोखाडा तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पंचक्रोशीतील 60 ते 70 गावपाडे संलग्न आहेत. तालुक्याच्या तोडीसतोड लोकसंख्येचे प्रमाण असून तलाठी कार्यालये , कृषी मंडळ कार्यालय , आरोग्य सेवा , बँका , पशुधन विभाग , विजमंडळ , झेरॉक्स त्याशिवाय वानसामान व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या बेगमीची विपूल साधन सुचिता असलेली एकमेव बाजारपेठ असल्याने नेहमीच परिसरातील जनतेचा मोठ्या प्रमाणावरील ओघ खोडाळा बाजारपेठेत सुरु असतो.
दरम्यान सद्यस्थितील ” लॉकडाऊन ” मुळे खाद्यपदार्थ विकणा-यांवर अक्षरशः ओढग्रस्थीची वेळ आलेली असून पर्यायाने नैमित्तिक खरेदी , बँकेच्या कामासाठी येणा-या आदिवासी आबालवृध्दांच्या पोटाला कृत्रीम टाच बसली असून अन्नपाण्यावाचून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
त्यातच शासनाने लॉकडाऊन काळासाठी देवू केलेली मदत बँकांमधून घेण्यासाठी परिसरातील गरजवंताची याठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. प्रस्तुत गर्दी ही मदतीच्या लालसेपोटी होत असली तरी असंख्य आबालवृद्ध लोकांना अन्नपाण्यावाचून ताटकळत रहावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
एकूणच साद्यंत परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक साकल्याने विचार करून खोडाळा पंचक्रोशीतील जनतेसाठी स्वतंत्र बाब म्हणून शिवभोजन थाळी सुरु करण्याची आग्रही मागणी खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील व उपसरपंच मनोज कदम यांनी जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे केली आहे. व प्रस्तुत निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री पालघर यांचेकडे सत्वर कार्यवाही हेतू सादर करण्यात आलेल्या आहेत.
2 Attachments