आरोग्यदूत महाराष्ट्र

कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर – आरोग्यमंत्री

मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनवर भर

मुंबई, दि.२३ : राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी येथे सांगितले.

आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बुधवारी रात्री संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या संवादतील महत्त्वाचे मुद्दे :

• कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई कीटची गरज भासू नये यासाठी फोटो बुथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्या रूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबुथ बसविण्यात येणार आहे.

• प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील.

• मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट लोकवस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये मध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.

• महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या.

• कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे.

• राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.

• महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.

• राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी पाच वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.

• कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!