ठाणे

पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नमाज पठणासाठी एकत्र येवू नये, घरी राहूनच सण साजरा करण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन

ठाणे (ता 23, संतोष पडवळ ): नागरिकांनी सार्वजनिक अथवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी अधिक संख्येने एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह इफ्तारीच्या अनुषंगाने एकत्र न जमण्याचे तसेच घरी राहूनच रमजान साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले असून ठाणे शहरामधील सर्व मुस्लीम बांधवांनी घरी राहूनच रमाजान साजरा करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
     महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. यासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महापालिका यांच्यामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दिनांक १४ मार्च, २०२० पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम, १८९७ लागू करण्यात आलेला आहे. तसेच भारतीय दंडसंहिता कलम १४४ अन्वये जमावबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे.
     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक तसेच क्रीडाविषयक कार्यक्रम रद करण्याबाबतची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे. नजीकच्या काळात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जिदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्यःस्थितीत विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते.
            या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजानिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे, त्यामुळे नमाज पठनासाठी त्यांनी एकत्र जमू नये असे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करण्याचे आवाहन केले आहे.
     त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये, घराच्या इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये, मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येऊ नये, कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी असे ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
               सबब सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत मुस्लिम बांधवांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!