महाराष्ट्र

गडचिंचले प्रकरणात कठोर कारवाई – गृहमंत्री अनिल देशमुख

गडचिंचले येथे गृहमंत्र्यांची भेट

पालघर दि. 7 : गडचिंचले गावात तीन जणांची जमावाने हत्या केली त्या ठिकाणी पाहणी करुन तेथील स्थानिक लोकांशी चर्चा केली. या प्रकाराचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून या हत्याकांडामध्ये जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होत. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री सुनिल भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त श्री. गंगाथरण, पोलीस अधीक्षक गौरव सिंह उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन आदी उपस्थित होते.

राज्यामध्ये 4 हजार 738 मदत शिबिर केंद्र असून या मदत शिबिरात 1 लाख 35 हजार बेघरांना आश्रय देण्यात आला आहे मदत शिबिरात त्यांना नाश्ता, जेवण व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. कारोना बांधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 4 लाख 35 हजार व्यक्तींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात विनाकारण वाहनासह फिरणाऱ्यांकडून 3 कोटी 56 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 53 हजार 330 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच जिल्हा बंदी असताना जे लोक दुधाची गाडी, टँकर, सिमेंट मिक्सर किंवा इतर वाहनाने प्रवास करत होते अशा 1281 अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यातील 8 कारागृह क्वॉरंटाईन

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील 8 कारागृह क्वारंटाईन करण्यात आले होते. कारागृहातील कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली होती. या काळात बाहेरचा व्यक्ती कारागृहात प्रवेश करु शकत नव्हता तसेच आतील व्यक्ती कोणत्याही कामाने बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये स्वयंपाकी याला कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील 72 कैद्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. या कैद्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने महानगरपालिका क्षेत्रात क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

आवश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी मुंबईत कार्यरत असून त्यांचे निवासस्थान मुंबईच्या बाहेर आहे. अशा अधिकारी, कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था करण्याचा विचार राज्य शासन करत आहे. राज्य शासनाने कोविड-19 बाबत नागरिकांना जनजागृती व्हावी तसेच त्यांना योग्य माहिती  मिळावी या उद्देशाने हेल्पलाईन चालू केली आहे. नागरिकांनी या हेल्पलाईनला प्रचंड प्रतिसाद देत 8 लाख 53 हजार नागरिकांनी या हेल्प लाईनच्या माध्यमातून संपर्क साधला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!