डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण -डोंबिवली महापालिका अंतर्गत येणाऱ्या ७ महसुली गावांमधील कोविड १९ रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय व टाटा आमंत्रण केंद्रामध्ये व्यवस्था करन्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे .
प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या ७ गावांची आरोग्यसेवा कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात यावी यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे .या निवेदनात पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या निळजे, घेसर, नांदिवली, गोळ्वली, हेदुटणे, काटई, कोळेगाव या ७ महसुली गावांना जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केवळ आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु सद्यस्थितीत या ७ महसुली गावांची कर वसुली कल्याण डोंबिवली महानगरपालिका करीत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आजदे अंतर्गत येणाऱ्या घरीवली, संदीप, मानपाडा, सोनारपाडा, दावडी या गावांची आरोग्यसेवा यापूर्वीच कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या गावांची आरोग्य सेवा वर्ग न केल्यामुळे या ७ गावातील रुग्णांना तसेच सहवासितांना महानगरपालिकेमार्फत रुग्णालयात किंवा टाटा आमंत्रण सेंटर मध्ये दाखल करून घेतले जात नाही. या रुग्णांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात जावे लागते त्यामुळे वेळ लागत असून मनःस्ताप सहन करावा लागत आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे महापालिकेतच असलेल्या परंतु निळजे आरोग्य केंद्रात येणाऱ्या या ७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. लोढा, पलावा, रिजन्सी, रुणवाल अशा मेगाप्रोजेक्टसह अनेक रहिवासी संकुलामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे. एवढया मोठ्या लोकसंख्येसाठी बदलापूर येथे केवळ १५ रूम देण्यात आल्या असून सध्याच्या परिस्थितीत त्याही कमी पडत आहेत, त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे मत आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला आहे .
तसेच आपण तात्काळ कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत येणाऱ्या ७ महसुली गावांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय व सध्या कार्यरत असलेल्या टाटा आमंत्रण सेंटर मध्ये कोरोनाबाधित हाय रिस्क सहवासितांना दाखल करून घेण्यासाठी संबंधिततांना आदेश द्यावेत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या ७ गावांची आरोग्यसेवा कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात यावी यासंदर्भात आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे यांनी दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सहसंचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांच्याकडे प्रस्ताव देखील पाठविला आहे. या बाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.