मुंबई, 16 मे, (संतोष पडवळ) : शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी (वय 32) हे ताप व सर्दी यामुळे आजारी होते. त्यामुळे कुलकर्णी यांनी रुग्णनिवेदन केले होते आणि घरीच राहण्यासाठी अर्ज केला होता.
कोरोनाची चिंताजनक परिस्थितीत असल्यामुळे हनुमंत कुलकर्णी यांनी सायन रुग्णालयात जाऊन 13 मे रोजी कोरोनाची चाचणी केली होती. आज 3 दिवसानंतर त्यांच्या रिपोर्ट प्राप्त झाला. त्यात हनुमंत कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
परंतु, आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास कुलकर्णी हे आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यांना तातडीने सायन रुग्णालय इथं उपचारासाठी नेण्यात आले परंतु, रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी कुलकर्णी यांना तपासून मयत घोषित केलं, अशी माहिती
शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. तसंच, हनुमंत कुलकर्णी यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं.