मुंबई, 16 मे, ( संतोष पडवळ ) : कोविड 19 महामारीमुळे खेड्यात राहणाऱ्या अनेक कुटुंबांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शासनाकडून रेशनच्या दुकानातून मिळणाऱ्या वस्तू दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. रोजंदारीवर काम करणारा फार मोठा वर्ग लॉकडाऊनच्या काळात त्रस्त झाला आहे.या अशा गंभीर परिस्थितीत देशाचे भविष्य असलेल्या तरुणाई जिद्दीने या गरजू लोकांसाठी एक लढा उभारत आहेत. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लव्हाळी(मुरबाड रोड, बदलापूर) येथे 150 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे 15 मे, 2020 रोजी वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे ₹1,00,000 जमा करून अन्नधान्य, तेल, कांदे-बटाटे इ. साहित्य वाटपासाठी उपलब्ध करून दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयातील स्वयंसेवक तनिष मानकर, वेदांत सावंत, जागृती नारखेडे आणि युक्ता खेर यांनी लॉकडाऊनच्या काळात सुमारे 900 गावकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. प्राचार्या डॉ. सोनाली पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यक्रम अधिकारी श्री. निखिल कारखानीस यांच्या देखरेखीखाली पार पडला. शिवभक्त आश्रम शाळेचे संचालक श्री. रमेश बुटेरे आणि मुख्याध्यापिका सौ. सायली बुटेरे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
“समाजातील विविध लोकांच्या प्रति असलेल्या जबाबदारीचे भान विद्यार्थ्यांनी दाखविले, यासाठी त्यांचा फार अभिमान वाटतो आहे. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवित राहू”-श्री. निखिल कारखानीस, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना.
“सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू. आमच्या महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक, विद्यार्थी आणि विशेषतः माजी विद्यार्थी यांनी मानवतेच्या परीक्षेत आज विशेष प्रावीण्य मिळवलं. जेव्हा समाजातील दीन-दुबळ्या घटकांची यथायोग्य काळजी घेतली जाईल तेव्हाच आपलं राष्ट्र प्रगतीपथावर असेल. इतिहास रचण्याची आपल्यासमोर संधी आहे, आपल्याला अभिमान वाटेल अशा प्रकारे आपण योगदान देऊया”-डॉ. सोनाली पेडणेकर,प्राचार्या, मुलुंड वाणिज्य महाविद्यालय
लॉकडाऊनच्या काळात जिथे तरुणांना नैराश्य येत आहे तिथेच NSS चे विद्यार्थी ऑनलाइन जागरूकता अभियान, मास्क वाटप, community किचन या उपक्रमांनी कोरोनाच्या जैविक युद्धात आपल्या सहभागाने मैलाचा दगड रचत आहेत.
photo gallery………………………………………………………………………………………………………………………


