मुंबई – राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना आजारातून नुकतेच बरे झाले आहेत. त्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळातील आणखी एका ज्येष्ठ मंत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या या मंत्र्यांचा चाचणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोरोनाची लागण झालेले हे राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री आहेत.
संबंधित मंत्र्यांचा मुंबईतील कारचालक कोरोना विषाणू बाधित निघाला होता.त्याच्याकडून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात आले आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. ते या आजारातून पूर्ण बरे होऊन झाल्यानंतर आता काँग्रेसच्या मंत्र्याना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर यातून बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढत आहे.त्यामुळे एकीकडे चिंता तर दुसरीकडे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत आहे. मागील आठवड्यात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकार कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत संपूर्ण राज्यात आंदोलन केले होते.