ठाणे (1 मे, संतोष पडवळ ) : केंद्र आणि राज्य शासनामार्फत कोरोनाबाबतच्या अटी शिथील केल्या आहेत. त्यानुसार आता महापालिकेकडूनही तसे आदेश पारित करण्यात येणार आहेत तरीही नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करावे आणि शासन म्हणून आम्ही जे काही नियम घालून दिले आहेत त्या नियमांचे पालन करावे. यासर्व दृष्टीकोनातून ठाणेकर नागरिकांनी प्रशासनाला साथ दिली तर येत्या दहा ते पंधरा दिवसात कोरोनावर मात करून त्याला आटोक्यात आणता येणे शक्य आहे असा विश्वास ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
महापालिका आयुक्तांनी सोमवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाण्यात विशेष करुन झोपडपटटी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढत असून हे 45 टक्के इतके असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्याच्या तुलनेत ठाण्यात मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे सांगून श्री. सिंघल यानी कोरोना बाबतचे नियम शिथील करीत असतांना नागरिकांनी सोशल डिस्टेंसीगचे पालन करावे, गरज असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन केले.
समाजातील 50 वर्षे वयोगटातील नागरिकांनी आणि 10 वर्षाच्या आतील मुलांनी घरीच राहण्याची आवश्कता असल्याचे सांगून प्रत्येक व्यक्तींनी कामावर जातांना ताप आहे किंवा नाही, ऑक्सीजनचे प्रमाण किती आहे, हे तपासूनच घराबाहेर पडावे, खरेदीसाठी जात असताना किंवा मॉर्निग वॅाक करताना, रस्त्यावर फिरताना किमान तीन फुटांचे अंतर नेहमी ठेवावे. हे सर्व करीत असतांना मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरात आता ॲम्ब्युलन्सविषयी नागरिकांच्या तक्रारी नसून आझच्या घडीला ठाणे शहरामध्ये जवळपास 88 च्या आसपास अॅम्ब्युलेन्स उपलब्ध आहेत, येत्या काही दिवसात 100 हून अधिक अॅम्ब्युलेन्स उपलब्ध होणार आङेत. त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये किती बेड शिल्लक आहेत याची माहितीही आता एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यासाठी विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात खास करुन झोपडपटटी भागात 50 फिव्हर क्लिनीक्स सुरु करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जवळपास 1 हजार जणांची टीम ही घरोघरी जाऊन सर्वे करण्याचे काम करीत आहेत. आता ही टीम कनेटंमेंट झोनमध्येही जाऊन काम करणार आहेत. कोरोना बाधित रुग्णांसाठी ग्लोबल इम्कॅप्ट हब येथे 1 हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरु आहे. तसेच म्हाडा अंतर्गतही 1 हजार बेडचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. सद्यस्थितीत शहरात 8 हजार बेड उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट करून ठाणे महानगरपालिका परिसरात घरोघरी जाऊन अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वापटही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यात नियम शिथील करण्यात येत असले तरी दुकाने सुरु करण्याबाबतही खरबदारी घेतली जाणार आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूची एका दिवशी आणि रस्त्याच्या उजव्या बाजूची एका दिवशी अशी आलटून पालटून दुकाने उघडी ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय झोपडपटटी भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
परंतु या सर्वात ठाणेकर नागरिक म्हणून आपली साथ यात खुप मोलाची असणार असून आपण साथ दिली तरच येत्या 10 ते 15 दिवसात आपण कोरोना निश्चितच आटोक्यात आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चौकट – येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. त्यादृष्टीकोणातून नाल्यांची सफाई योग्य पध्दतीने सुरु आहे. तसेच आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका देखील सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.