ठाणे वार्ताहर { संतोष पडवळ } : ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील बेतवडे गाव लगत असलेल्या रुणवाल या गृह संकुलात ठाणे महापालिका प्रशासनाकडून विलगीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या गृहसंकुलात राहणाऱ्या रहिवाशांनी या विलागीकरण केंद्रास सोमवारी कडाडून विरोध केला. यावेळी गृहसंकुलातील सुमारे 100 ते 150 रहिवाशांनी मुख्य प्रवेशद्वारव विरोध करण्यासाठी जमले होते. यावेळी महापालिकेने पोलिसांना पाचारण केले. मात्र, नागरिकांनी विरोध कायम ठेवत महापालिका कर्मचार्यांसह पोलिसांना देखील इमारतीच्या आत प्रवेश न देता प्रवेद्वारावरच रोखल्यामुळे काहीकाळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता. मागील तीन महिन्यात या गृह संकुलासह आजूबाजूच्या दोन गावांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नसताना, या परिसरात विलागीकर्ण केंद्र सुरु करण्याचा घाट का घातला जात आहे असा सवाल देखील रहिवाशांकडून विचारला जात आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील बेतवडे गावात रुनवाल माय सिटी हे गृहसंकुल असून या ठिकाणी एकुण १० इमारती आहेत. या इमारती एकमेकांना लागून उभ्या आहेत. त्यापैकी ५ इमारतींमध्ये १५० कुटुंब आठ ते दहा महिन्यांपासून वास्तव्यास आहेत. तर, उर्वरीत पाच इमारती रिकाम्या असून त्याचा ताबा ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या टाळेबंदी असल्यामुळे या पाच इमारतींमध्ये काही कुटुंब राहण्यास आली नसून टाळेबंदी संपल्यावर ते या ठिकाणी राहण्यास येणार आहेत. करोनाच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यापासूनच आम्ही सर्वच सदस्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत. बाहेरील व्यक्तिला गेल्या दोन महिन्यापासून इमारतीत प्रवेशही दिला जात नाही. टाळेबंदीच्या काळापासून आम्ही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी देखील बाहेर पडलेलो नाही. किरणा माल, भाजीपाला आणि दुध विक्रेत्यांना आम्ही संकुलाच्या आवारात प्रवेश दिलेला नाही. संकुलाच्या प्रवेशव्दारावर जाऊन आम्ही स्वत: या सर्व वस्तू खरेदी करतो. मात्र, दोन महिन्याहून अधिक काळ हे नियम पाळून जर या ठिकाणी महपालिकेने करोना विलगिकरण कक्ष उभारला तर आमच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला असल्याचे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केले. दरम्यान, या परिसरात असणाºया गावांचे जनजीवनही या केंद्रामुळे विस्कळीत होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर, या संकुलाच्या आजुबाजुच्या परिसरात असणाºया गावांमध्ये एकही करोना रुग्ण अद्याप आढळला नसून हे केंद्र झाल्यास येथील गावकरांनाही करोनाची लागण होण्याची शक्यता रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलीस व पालिका प्रशासने रहिवाशांचा विरोध झुगारून, प्रवेश दाराचे टाळे तोडून गृह संकुलात प्रवेश केला. यावेळी पोलीस व पालिका प्रशासना सोबत असलेल्या गावकर्यांनी गृह संकुलातील रहिवाशांना मारहाण केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. तसेच काही रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती हि रहिवाशांनी दिली.