डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या कोपर पुलाच्या कामाची आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी पाहणी केली यावेळी पालिका आयुक्तांनी कोपर उड्डाणपूलाचे काम पुढील चार महिन्यात पूर्ण करन्याचे आदेश संबंधितांना दिले.
डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पूल धोकादायक झाल्याने १५ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सदर पूल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास लवकरच दूर करण्यासाठी कोव्हिड – १९ प्रतिबंधात्मक नियोजनाअंतर्गत संचार बंदीचा कालावधीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने रेल्वे सेवा बंद असलेल्या काळात उड्डाणपूल पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घेण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्णय घेतला. १७ मार्च रोजी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. त्यामुळे उड्डाण पूल जोडण्याचे साधारणतः ३ महिने कालावधीचे काम १५ दिवसाच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे उड्डाण पुलाचा गर्डर तसेच बेअरिंग दुरुस्तीचे काम करण्यात आले. उड्डाण पुलाकरिता नवीन डेस्क स्लॅब बांधण्यासाठी, गर्डर्सवर स्टील प्लेट टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वी ट्रॅकवरील पूल दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर कामाचा प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प तरून जुनेजा यांनी सोमवारी सायंकाळी सदर पुलाची पाहणी केली. आणि ठेकेदार मे. पुष्पक रेल कन्स्ट्रक्शन यांना संपूर्ण पुलाचे काम पुढील ४ महिन्यात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.