आजपर्यंत कोरोना बांधितांची संख्या २८७ इतकी
*शहर तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन*
अंबरनाथ दि. ०४ (नवाज अब्दुल सत्तार वणू)
अंबरनाथ शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून आज ७३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील रुग्ण संख्या ही २८७ इतकी झाली आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने किमान तीन दिवस शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन अंबर भरारी संस्थेचे सर्वेसर्वा तथा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले आहे.
आज अंबरनाथ पालिकेमार्फत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार आज आढळलेे रुग्णांना समुदाय संसर्गातून कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या २८७ झाली आहे. आतापर्यंत १२१ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तर १५९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि आज सिटी हॉस्पिटल अंबरनाथ येथून ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
शहरातील वाढणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता,’मी तीन दिवस घराबाहेर पडणार नाही’ या अभियानाअंतर्गत दिनांक ५, ६, ७ जून रोजी शहर कडकडीत बंद ठेवावे असे आवाहन अंबर भरारी, पत्रकार समन्वय समिती, पत्रकार सुरक्षा समिति, अंबरनाथ नगरपरिषद अंबरनाथ यांनी केले आहे. कोरोना वाढ/ संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी किमान तीन दिवस संपूर्ण बंद (वैद्यकीय सेवा वगळता) ठेवण्यात येणार आहे.
अंबरनाथमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.त्यामुळे पोलीस,आरोग्ययंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. सर्व पक्षीय शहरप्रमुख, नगरसेवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व नगरपरिषदेचे अधिकारी व पोलीस अधिकारी आणि पत्रकार बंधू यांनी मिळून जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी किमान तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे. त्याकरिता ‘मी, तीनदिवस घराबाहेर पडणार नाही’ ही मोहीम सुरु करण्यात आली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आव्हान करण्यात आले आहे.