महाराष्ट्र मुंबई

असेही अधिकारी : मुंडावरे, सोनवणे यांच्या कामगिरीने आदर्श !!

स्वेच्छेने जबाबदारी स्विकारुन ते झाले कोरोना योद्धे

नाशिकः कोरोना असे नाव घेतले तरी सामान्यांना भीती वाटते. अनेक शासकीय अधिकारी तर केवळ आपल्याला बंधनकारक आहे, म्हणून या संदर्भातील सेवा देत असताना नाशिकमध्ये दोन अधिकार्‍यांनी या संदर्भातील जबाबदारी स्वेच्छेने स्विकारुन कोरोनाशी दोन हात करण्यात सक्रिय सहभाग दिला आहे.
यातील उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची बदली झाल्यानंतर सध्या नव्या ठिकाणी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असताना काम सुरु केले तर मालेगाव महापालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी देखील जोखीम पत्करुन जबाबदारी स्विकारली आहे. अशा अधिकार्‍यांमुळे मात्र अन्य अधिकार्‍यांचे मनोबल उंचविण्यास मदत झाली आहे.
मालेगावला एकापाठोपाठ एक रुग्ण आढळत गेले आणि मालेगाव हॉस्टस्पॉट झाले. मालेगावला जाणे किंवा तेथून परत येणे हे देखील सर्वांनाच भीतीदायक वाटत असताना याच महापालिकेत यापूर्वी आयुक्त म्हणून काम केल्याचा पूर्वानुभव असलेले जीवन सोनवणे पुढे आले. खरे तर 38 वर्षे शासकीय सेवा बजावल्यानंतर 2017 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वय 60 झाले आहे. अशा वयोगटातील नागरिकांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे माहिती असतानाही त्यांनी जोखीम पत्करली आणि मालेगावमध्ये काम केल्याचा अनुभव कामी येईल म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची इच्छा त्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी देखील मान्यता दिली आणि त्यानुसार त्यांनी मालेगावमध्ये कामकाजही केले.
अशाच प्रकारे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमजीवी आणि निर्वासितांचे स्थलांतर सुरु झाले आणि त्यांना रोखून निवारागृहात ठेवण्याचे काम सुरु होत असतानाच उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी मोठी जबाबदारी निभावली. पर्यटन विभागात ते प्रतिनियुक्तीवर गेले होते. तेथून ते मूळ सेवेत 16 नोव्हेंबर रोजी आले. त्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्याच दरम्यान लॉकडाऊन झाल्यानंतर मुंडावरे यांनी स्वतःहून जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेतली आणि काही जबाबदारी असेल तर ती स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना श्रमिकांचे निवाराशेड आणि अन्य कामात समन्वय साधण्याची जबाबदारी दिली. त्यांनी ती स्विकारली. निर्वासितांना विविध सुविधा एनजीओच्या माध्यमातून देत असतानाच केंद्र शासनाकडे प्रायोगिक तत्वावर नाशिकमधून श्रमिकांना त्यांच्या गावी पाठविण्याचे ठरवले. त्या वेळेपासून आतापर्यंत रेलवेतून 9 हजार 800 श्रमिकांना त्यांच्या मूळ राज्यात पाठविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत असताना वेतन प्रलंबित आहे.

सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड होती. यापूर्वी 2005 मध्ये मुंबईतील महापूर आणि त्यानंतर केदारनाथ येथील प्रलयानंतर तेथे पुनर्वसनाचे काम केले आहे. यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती बघता घरी स्वस्थ बसवत नव्हते. श्रमिकांची सर्व व्यवस्था करताना त्यांना मूळे गावी सुरक्षितरित्या पाठविले, याचा आनंद वाटतो. — नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी, नाशिक. 

कोरोना काळात शासकीय यंत्रणेला मदतीची गरज होती. मी मालेगावमध्ये काम केलेले असल्याने संपूर्ण शहराची मला माहिती आहे, त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी मदत केली. आज मालेगाव येथील बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, याबद्दल समाधान वाटते — जीवन सोनवणे, माजी आयुक्त, मालेगाव महापालिका.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!