निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त कोकणवासीयांना तातडीने आर्थिकमदतीची गरज
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोकणी माणूस कधीच कोणापुढे वाईट परीस्थिती असतानाही हात पसरत नाही.करोनाच्या प्रभावामुळे कोकणात निसर्ग चक्रीवादळाने जे नुकसान केले त्याची चर्चा झाली नाही.कोरोनाच्या आपत्तीमधून सावरण्या आधीच आलेल्या या वादळामुळे कोकणवासियांचे न भरून निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे.निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकणामध्ये अपरिमीत नुकसान झाले आहे. दररोज उत्पन्न देणारी झाडे, फळबागा उध्वस्त होऊन झालेल्या नुकसानाबरोबरच रस्त्यावरील झाडे घरे विजेचे खांब, पडून तेथील जनजीवन ठप्प झाले. या हानीची व्याप्ती मोठी आहे. वार्षिक उत्पन्नाचे साधन असलेल्या फळ – फुलबागा, सुपारी – नारळाची झाडे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे पुढील १० ते १५ वर्षांचे उत्पन्नाचे साधनच नष्ट झाले आहे. १२ वर्ष लागतात संगोपन खर्च आणि कष्ट करून झाडे मोठी करण्यासाठी, आता त्यातच मोसमी पाऊस सुरु झाल्याने कौले आणि पत्रे उडालेल्या घरांमध्ये राहणे अशक्य झाले आहे. महाराष्ट्रामध्ये नेहमीच वडीलधाऱ्या भूमिकेत असलेल्या मराठा समाजाकडून शासनास आग्रही विनंती, गाऱ्हाणे आहे की, कोकणवासियांवर ओढविलेल्या या परीस्थितीवर त्वरित उपाययोजना करण्यात यावी आणि वादळग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात लवकरात लवकर देण्यात यावा. या आपत्तीमध्ये उध्वस्त झाल्यामुळे त्याला वेळेत सावरणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण वेळेत पार पा डावी अशी मागणी अनिल परब,पालकमंत्री, रत्नागिरी ,यांच्याकडे अखिल मराठा फेडरेशनच्या वतीने सरचिटणीस राजेंद्र साळवी यांनी केली आहे.