डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात संचारबंदीचे नियम शिथील केल्यानंतर कोवीड रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे संचारबंदी शिथील झाल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना अधिसुचना देणे थांबवले होते. मात्र मंगळवार पासून शहरात पुन्हा पोलिस तसेच महापलिकेतर्फे उद्घघोषणा सुरू करण्यात आल्या आहेत.
कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसाला कोवीड रूग्णांची संख्या दिवसाला २५० च्या वर जात आहे. त्यामुळे बेड्स, व्हेटीलेटर्स, हॉस्पीटल्स च्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यातच शव वाहिका, रूग्णवाहिका यांची संख्या देखील अत्यल्प आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी बसावे, अत्यावश्यक सेवेत असल्यास बाहेर पडावे तसेच सॅनीटायझर, मास्कचा वापर करावा , दुकानात देखील एकाचवेळी गर्दीकरू नये अशा विविध सुचना पोलिसांकडून देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर जोशी हायस्कुल , घारडा सर्कल , शेलार चौक , देवी नाका चौक अशा विविध चौकत पोलीस तैनात असून ज्या नागरिकांनी मास्कचा वापर केला नाही त्या नागरिकांना मास्क घालण्यासाठी पोलीस दटावत आहेत. विशेष म्हणजे सायंकाळी पाच नंतर सर्व दुकाने बंद झालीच पाहिजेत याकडे पोलिसांनी कटाक्षाने लक्ष दिले. विशेष म्हणजे गेले दोन दिवस कोवीड १९ चे रूग्ण कसे रोखावे याकडे अधिक लक्ष दिले जात असून या संदर्भात महापालिका, पोलीस, आमदार, खासदार यांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये पुन्हा जनजागृती करा असे आदेश मंत्री महोदयांकडून देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. पूर्वी सारखे कडक संचारबंदी करण्यापेक्षा नागरिकांनी नियम पाळले तर रूग्णांची संख्या नक्कीच आटोक्यात येईल अशी चर्चा देखील या सभेत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र कल्याण – डोंबिवली परिसरात हे चित्र उलट दिसत असून चौकचौकात गप्पाचे फड रंगलेले दिसत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तर घराबाहेर पडू नये असे वारंवार सांगण्यात येत असून देखील नियमांचा भंग केला जात असल्याने रूग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे
महापालिका आणि पोलिसांकडून कोवीड १९ संदर्भात डोंबिवलीत पुन्हा उद्घोषणा सुरू
