डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून शहरातील आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यात डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु असून त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. या रुग्णालय सुमारे १५ कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत.त्यामुळे येथील कर्मचारी वर्ग पुरता घाबरलेला असून आमच्या व कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाला का नाही असा प्रश्न उपस्थित केला. मुंबई महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय केली असून आपल्या पालिकेला हे का जमत नाही असाहि सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
काम करावे तर कोरोना होईल आणि नाही केले तर नोकरी जाईल अशी भीती केडीएमसीतील कर्मचारी वर्गाला सतावित आहे. मात्र सरकारी कर्मचारी असल्याने काम करावे लागले असे ग्राह्य धरून कर्मचारी काम करत आहेत.डोंबिवलीतील पालीकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात अनेक कर्मचारी, डॉक्टर्स, परीचारीका दिवसरात्र करतात. मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाला नसल्याची ओरड सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण ,जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ सचिव प्रशांत पाटेकर, युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील,आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एका कर्मचाऱ्याने मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे कसे बारा वाजले आहेत याची माहिती दरेकर यांना दिली. इतकेच नव्हे तर काही डॉक्टर्सनेही रुग्णालयात आम्ही काम कसे करणार अशी वास्तविकता मांडली. यावेळी विरोधी पक्ष नेते दरेकर आणि आमदार चव्हाण यांनी मुंबई महानगरपालिका ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचीराहण्याची सोय करते त्याप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर्स, परीचारीका आणि कर्मचारी वर्गाला राहण्याची सोय प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका का मिळत नाही..
कल्याण-डोंबिवली शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका का मिळत नाही असा प्रश्न भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ सचिव प्रशांत पाटेकर यांनी यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारला. रुग्णांच्या नातेवाईकांना दोन दिवसांनी होमक्वारनटाई केले जाते.कोरोना चाचणी करणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालययातील लॅबबाबतही शंका असल्याचे पाटेकर यांनी सांगितले.