कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम यांनी मागील ३ महिन्यांचे विजबिल ५० टक्के माफ करण्याची मागणी केली आहे.महावितरणने ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवून सर्वसामान्य जनतेला जेरीस आणले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेले तीन महिने वीज बिल सरासरी पाठविण्यात येत होते.मात्र आता महावितरणने मोठ्या प्रमाणात वीजबिल आकारणी सुरू केली आहे,अनेक ग्राहकांना ५ पट विद्युत बिल पाठविली आहेत..त्यामुळे ही वीज बिले आहेत की वसुली.. असा सवाल उपस्थित होत आहे.
टाळेबंदी शिथिल करून १५ दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे सगळीकडे पैसेच पैसे आले असल्याचा समज होऊन वीज बिल यायला सुरवात झाली आहे. ही वीज बिले पाहून डोळे पांढरे होत आहेत.अत्यंत चुकीच्या पद्धतीने वीज बिल आकारणी करण्यात आली आहे. ही वीज बिले पाहून एखादा सर्वसामान्य नागरिक हृदयविकाराच्या झटक्याने जीव सोडेल इतक्या भरमसाठ रक्कमेची विजबिलं आहेत.
सर्वसामान्य जनता सध्या तरी जगावे कसे, या विवंचनेत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ज्यांच्या आहेत त्यांचे पगार कमी आले आहेत. पगार मिळाले तर ते कापून मिळतआहेत,
व्यावसायिकाचे प्रश्न तर अधिक गंभीर आहेत.अनेक व्यवसाय बुडाले आहेत आणि नव्याने काही केलं तर अपेक्षित उत्पन्न नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.अजूनही शहरातील वेगवेगळे भाग लॉकडाऊन केले जात आहेत. चालू आस्थापने, दुकाने बंद केली जात आहेत. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यातून आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.अशी परिस्थिती असताना हजारो रुपयाची बिलं नागरिक कशी भरणार? असा प्रश्न सर्वच महिलांना पडला आहे
नागरिकांना येणाऱ्या भरमसाठ विजबिलाविरोधात काही दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यालयावर मनसेने धडक दिली होती,त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला विजबिलांच्या तक्रारी दूर करण्यात येतील असे आश्वासन दिले होते.
टाळेबंदी काळात सर्व नागरिकांचे उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद झाल्याने विजबिलाची रक्कम भरणे कठीण झाले आहे त्यामुळे विजबिलाची ५० टक्के रक्कम माफ करावी अशी मागणी मनसे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व वीज कंपनीचे मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.