ठाणे : लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याच्या नैराश्यातून २८ वर्षीय तरुणाने हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. विनोद गणेरी (२८) असे या तरुणाने नाव आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आई वडिलांसह राहणारा विनोद हा एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करीत होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेल्यामुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबानी पोलिसांना दिली असल्याचे ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली आहे.
शुक्रवारी त्याने ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल आयलँडमध्ये एक खोली बुक केली होती. रात्री उशिरा हॉटेलचे कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले. खोलीतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याची बाब हॉटेल व्यवस्थापक यांना देण्यात आली. व्यवस्थापक यांनी बनावट चावीने दार उघडले असता विनोदने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या ठाणे नगर पोलिसांनी विनोदचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालय येथे पाठवला. मृतदेहजवळ कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल आयलँडच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी दिली आहे.