हाय फ्रेंड्स,
दहावीनंतर पुढे काय? हा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांनी आपल्या या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध असलेल्या
संधींच्या माहितीत शोधले असेल. त्यापैकीच एक मी. मला तुम्ही जीवनाचा जीवनातील महत्वाचा भाग म्हणून निवडले
तर तुमचे जीवन निश्चित बदलेल. मी तुम्हाला अल्प फीमध्ये, कमी खर्चात, कमी वेळात प्रभावी व्यवसाय शिक्षण देणारी संधी आहे
आणि मी आज तुमच्या दारावर येऊन तुमच्याशी संवाद साधतीय. कसे आहात सगळे? काळजी घ्या स्वतःला जपा…
जागतिक महामारीने थैमान घातलेले असून महाराष्ट्रसुद्धा याला अपवाद नाही. आणि जग आपल्या क्षमतांसह कोविड – -19 शी लढतंय.
सर्वच विचित्र वातावरणात थांबून चालणार नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यावसायिक आणि अन्य सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञ, कामगार, मजूर
स्वयंरोजगार करणारे अनेक परप्रांतीय बांधव त्यांच्या त्यांच्या राज्यात परतले असतांना राज्यातील युवकांना रोजगार अथवा
स्वयंरोजगार मिळवता येतील असे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात मनुष्यबळाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची हीच ती वेळ आहे.
जर आपण ही वेळ साधली तर खरी कोविड – -19 ही आपत्ती न ठरता इष्टापत्ती ठरेल. माझ्यावर ठेउ शकता विश्वास…
राज्यातील तरुणांनी लवकरात लवकर आवश्यक व्यवसाय शिक्षण पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरते. आता असे शिक्षण देणारी व्यवस्था राज्यात आहे.
तेव्हा चिंता करू नका. माझे नाव आहे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम योजना. मलाच एचएससी व्होकेशनल असेही म्हटले जाते.
पूर्वी मला किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम योजना किंवा एमसीव्हीसी म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्र शासनाच्या
दोन विभागांच्या म्हणजे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या अधीपत्याखाली असलेले व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या अधिपत्याखाली असलेले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या महत्वाच्या यंत्रणांमार्फत आणि त्यांच्या समन्वयातून माझे संचलन, नियंत्रण, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन करण्यात येत असल्याने माझ्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता.
मी म्हणजे महाराष्ट्रात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम योजना 53 शासकीय , 924 अशासकीय अनुदानित आणि 540 विनाअनुदानित
अशा एकूण 1517 संस्थात तुमच्या स्वागतासाठी उपलब्ध आहे.
माझी ठळक वैशिष्ट्ये सांगायची म्हटले तर
1. अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षाच्या कालावधीत तुमच्यासोबत असते .
2. गेल्या 32 वर्षांपासून अखंडितपणे मी राज्यात तुमच्या प्रगतीसाठी झटतीय.
3. कुठल्याही विद्यार्थ्याला कमी वयात रोजगार किंवा स्वयंरोजगारक्षम करण्याइतकी क्षमता माझ्यात आहे.
4. औद्योगिक आणि व्यावसायिक अपेक्षा विचारात घेऊन माझ्यात चांगले बदल केले आहे.
5. वेगवेगळ्या गटातून किंवा सेक्टर मध्ये हे 20 माझी वेगवेगळी रूपे आहेत.
6. महाराष्ट्रातील सुमारे 1517 संस्थांत माझ्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण दिले जाते.
7. शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून माझ्या सर्व रूपात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत.
. माझ्या माध्यमातून तुम्ही इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे शिकायचे आहे
ते उच्च शिक्षण घेऊ शकतात आणि ते पीएचडी किंवा पीएचडी नंतरही शिकू शकतात.
8. शिकाऊ उमेदवारी योजनेत माझा समावेश आहे.
9. ऑन-द-जॉब ट्रेनिंग आणि औद्योगिक, व्यावसायिक आणि वित्तीय संस्थांच्या भेटींतून अनुभव घेता येतो.
10. माझ्या माध्यमातून शिकत असताना प्रात्यक्षिकांचा सरावामुळे तुमचा आत्मविश्वास आणि जिद्द खूप वाढते.
11. माझ्या माध्यमातून मिळणारे शिक्षण अत्यंत कमी खर्चामध्ये मिळत असते.याचे कारण
म्हणजे या दोन्ही वर्षात भरावी लागणारी फी अल्प आहे. अन्य शिक्षणाच्या योजनांचा
विचार करता नगण्य शुल्कामध्ये उत्तम आणि प्रभावी असे शिक्षण या अभ्यासक्रमामार्फत
विद्यार्थ्यांना घेता येते.
12. मर्यादित विद्यार्थ्यांची संख्येमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी भरपूर वेळ देता येतो
13. गणित, विज्ञानासारखे क्लिष्ट विषय नसल्याने विद्यार्थ्यांना ताण-तणाव तुमच्यावर नसतो.
तणावमुक्त वातावरणात शिकल्याने व्यक्तिमत्वात बदल घडतात
14. इयत्ता 10 वीत 1 किंवा 2 विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही वर्ष वाया जाऊ नये
म्हणून काही अटी शर्तींसह माझ्या माध्यमातून इयत्ता 11 वीला प्रवेश मिळतो.
मित्रांनो,माझ्या विविध रूपांची माहिती बघू.
इंजीनियरिंग सेक्टरमधील इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी,
कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या सहा रूपात माझा समावेश आहे, पॅरामेडिकल सेक्टरमध्ये रेडिओलॉजी
टेक्निशियन, मेडिकल लॅब टेक्निशियन, ऑफ्थॅल्मिक टेक्निशियन, चाईल्ड, ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विसेस अशा चार रूपात
माझा समावेश आहे. कॉमर्स अँड ट्रेड या सेक्टरमध्ये लॉजिस्टिक अँड सप्लाय मॅनेजमेंट, अकाउंटिंग-फायनान्शिअल ऑफिस असिस्टंट,
बँकिंग-फायनान्शिअल सर्व्हिसेस- इन्शुरन्स आणि मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट या रूपात माझा समावेश होतो. हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील
टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि फूड प्रॉडक्शन या दोन अभ्यासक्रमांचा समावेश होतो. एग्रीकल्चर सेक्टर मध्ये हॉर्टिकल्चर,
क्रॉप सायन्स आणि एनिमल हसबंडरी डेअरी टेक्नॉलॉजी या तीन रूपात माझा समावेश होतो तर फिशरी सेक्टरमध्ये फिशरी
टेक्नॉलॉजी अशा एकमेव रूपात समावेश होतो.
दोन वर्षाची मूल्यमापन पद्धती कोणती आहे? याची थोडक्यात माहिती घेऊ.
अकरावी आणि बारावीला ८ विषय आहेत. पहिला विषय इंग्रजी. कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखांनाही जो अनिवार्य विषय म्हणून
शिकवला जातो. दुसरा विषय म्हणजे भाषा यात मराठी-हिंदी किंवा अन्य भाषांचा समावेश आहे. जनरल फाउंडेशन कोर्स म्हणजे पायाभूत
अभ्यासक्रम हा तिसरा विषय. यात रोजगार कौशल्य विकास इयत्ता अकरावीला आणि उद्योजकता विकास इयत्ता बारावीला शिकवला जातो.
अनिवार्य असलेले विषय आहेत पर्यावरण शिक्षण आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण हे दोन विषय पण विद्यार्थ्यांना शिकावे लागतात आणि
या विषयांचे मूल्यमापन हे श्रेणीनुसार केले जाते. हे पाचही विषय सर्व अकरावी आणि बारावी करिता कॉमन आहेत. माझ्या विविध रूपांनुसार तीन वैकल्पिक विषय इयत्ता अकरावीला आणि तीन विषय इयत्ता बारावीला शिकावे लागतात. इयत्ता अकरावी आणि बारावीची परीक्षा ही प्रत्येकी सहाशे गुणांची होत असते.
मित्रांनो, घरची परिस्थिती बेताची आहे, आणि ज्यांना तातडीने स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे, स्वतःची ओळख करण्याची जिद्द आहे अशा विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता आणि अधिक विचार न करता माझ्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या विविध रूपातील एका रुपाला जाणून घेण्यासाठी प्रवेश घ्यायला हवा हे मी आग्रहाने सांगेल. माझ्याबाबत अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपल्या नजीकच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातअथवा नजीकच्या कुठल्याही व्यवसाय शिक्षण देणाऱ्या संस्थेत भेट द्या किंवा https://www.dvet.gov.in/ या संकेत स्थळावर जा आणि मला जाणून घ्या. त्यानंतर आपल्या आवडीचे माझे रूप निवडावे. असे आवाहन मी करते. दोन वर्षात प्राप्त केलेल्या माझ्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर आपण जीवनामध्ये निश्चित यशस्वी व्हाल आणि आपल्या कुटुंबाचे, आपल्या समाजाचे आणि पर्यायाने आपल्या देशाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून सिद्ध व्हाल.आपल्या योग्य करिअरच्या संधीच्या निवडीसाठी करता आपल्याला व आपल्या पालकांना हार्दिक शुभेच्छा.