ठाणे (21) :– महापालिकेच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केट परिसरात करण्यात येणा-या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भाजीपाला मार्केटला भेट देऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले.
ठाणे शहरात हॉटस्पॉट वगळता उर्वरित ठिकाणी लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. तथापि, हॉटस्पॉटच्या ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिले होते. तसेच बाजारपेठा, मंडई या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा हयांनी सर्व अधिका-यांना स्थायी निर्देश देऊन हॉटस्पॉटची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने हॉटस्पॉटस् आणि बाजारपेठाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केट, महात्मा फुले मंडईची पाहणी केली. तसेच या परिसरात करण्यात आलेल्या बॅरॅगेटींगचीही पाहणी केली.
यावेळी आयुक्तांनी बाजारपेठेत गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात सांगितले.
तसेच नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, नौपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.