महाराष्ट्र

महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी साधला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संवाद
मुंबई, दि.२१: महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील कृषीविद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री  दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सल्लागार अजोय मेहता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी विश्वनाथा,डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही.एम.भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ ए. एस. धवन यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची गरज
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे चांगले काम करत आहेत. परंतू त्यांच्या कामातून भविष्यात  शेती आणि शेतकऱ्याला  आणखी पुढे कसे नेता येईल याचा मार्ग दिसला पाहिजे. शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची गरज आहे. संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून जे विकले जाईल तेच पिकवायची गरज असून शेतकऱ्यांना संघटित करतांना  विभागवार निश्चित केलेल्या दर्जाचीच पिके पिकतील, ती बाजारपेठेत विकली जातील यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करावे. अशा उत्पादनांना, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी त्याचे मार्केटिंग कसे करता येईल याचाही विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले.
दुध कांदा, कापूस अशा वेगवेगळ्या पिकांबाबतीत असलेली अनिश्चितता संपवायची आहे यासाठी  प्रत्येक पिकाचे, वाणाचे वेगळेपण ओळखून  पिके घ्यावीत. त्यासाठी महाराष्ट्राची विभागवार मांडणी करून फळ, धान्य, प्रक्रिया उद्योग यांची निश्चिती करावी, त्यांचा दर्जा राखतांना आपली उत्पादने जागतिक दर्जाची आहेत का, याचा अभ्यास करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
विभागवार पिके पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सभासद नोंदणी शासनाकडे व्हावी, त्याला चांगले बियाणे, खते देऊन बळकटी देतांना बाजारपेठेची शाश्वती देण्याचे प्रयत्न व्हावेत. उत्पादन वाढले परंतू शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न झाला पाहिजे, शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे.
कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता दाखवावी तसेच कृषी विद्यापीठाच्या प्रयोगाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा. प्रयोग फक्त प्रदर्शनात न राहाता त्याची सार्वत्रिक अंमलबजावणी व्हावी. निर्यातक्षम उत्पादने घ्यावीत. ती स्थानिक बाजारपेठेत ही विकावीत. आपल्या लोकांनाही त्यामुळे उत्तम दर्जाचे अन्न मिळेल.
शेतीत दर्जोन्नती आणि  सुधारणा महत्वाची
शेतीमध्ये ही दर्जोन्नती (अपग्रेडेशन) आणि  सुधारणा (रिफॉर्म्स) खुप महत्वाची आहे. यातूनच शेतकरी स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, शेती आणि शेतमालासाठीही “गोल्डन अवर” महत्वाचा आहे. वेळेत शेतमालाची खरेदी आणि विक्री होणे गरजेचे आहे. नसता वाढीव किंमतीचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता व्यापाऱ्यांना मिळतो.
शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. कोणताही उद्योजक कुठेही गुंतवणूक करतांना आधी मार्केट सर्व्हे करतो. तसेच शेतीचे ही आहे. शेतीतही मार्केट सर्व्हे अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले.
जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार-कृषिमंत्री  दादाजी भुसे
कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले की, विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जे विकेल ते पिकेल ही संकल्पना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठांनी विविध वाणांचे संशोधन करतांना शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लहान यंत्रांचे संशोधन करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे ब्रॅंडींग होणे गरजेचे असल्याचे सांगत सोयाबीनचे बियाणे संवेदनशील असते बियाण्यांवरील आवरण टणक होण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी संशोधन करण्याचे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांना व्यापारीभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे श्री. भुसे यांनी सांगितले.
विषमुक्त शेतीसाठी सेंद्रीय शेती कडे ओढा- राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
राज्यात आधुनिक शेती आणि सेंद्रीय शेतीला चालना मिळण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केले.
कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रम हा बदलत्या काळाशी सुसंगत असावा, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले. हवामान बदलावर आधारीत वाण विकसीत करण गरजेचे असून त्यासाठी प्रत्येक विद्यापीठात एक स्वतंत्र कक्ष तयार करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी मांडली. वनशेतीला चालना देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चारही कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंनी संशोधन, बियाणे मागणी व पुरवठा, विद्यापीठांनी संशोधन केलेले नवीन वाण, परिसर मुलाखती आदी विषयांवर सादरीकरण केले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!