पावसाचा खोळंबा शेतक-यांच्या मुळावर ! दुबार पेरणीचे संकट : शेतकरी हवालदिल
दीपक गायकवाड – : मोखाडा तालुक्यात पावसाने प्रदीर्घ दांडी मारली आहे. त्यामुळे नागली आणि हळवी भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. आत्ता लगेचच सलग पाऊस झाला नाही तर उभी पिके हातची जाणार असल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार – मोखाडा तालुक्यातील शेतकरी हे हंगामी शेती आणि वरच्या पाण्यावर अवलंबून असतात तालुक्यात कुठेही शेतीलायक शिंचन सुविधा नाही त्यामुळे पावसाने कृपा केली तरच शेतक-यांची उपजीविका चालते मात्र यंदा पावसाचा प्रदीर्घ खोळंबा शेतक-यांच्या अक्षरशः मुळावर उठल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तालुक्यात कुठेही लावणी लायक पाऊस न पडल्याने सर्वत्र लावणीचे कामे खोळंबली आहेत. मुसळधार पाऊस असल्याशिवाय येथील लावणी होत नाही. त्यामूळे नागली आणि हळवी भातपिके पोटरीत येवूनही शेतक-यांना लावणीची कामे मार्गी लावता येत नाही. त्यामुळे नागली व भाता सारखी उपजीविकेचे पिकेच हातातुन जातात की काय? की दुबार पेरणी करावी लागणार! अशी विवंचना शेतक-यांना भेडसावत आहे. कोरोना सारख्या महामारीने हाताला काम नसल्याने दुबार पेरणी झेपणारच नसल्याने वरुण राजाचीच करुणा भाकतांना येथील हतबल शेतकरी दिसत आहे.
आम्ही ८ महिने रोजंदारी करुन शेतीसाठी पै – पै जमवून शेती करीत असतो. परंतु यंदा कोरोनाने रोजगार हिरावला असतांनाच पावसानेही पाठ फिरवल्याने आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे असा उद्विग्न सवाल लक्ष्मण तेलम यांनी विचारला आहे.
लक्ष्मण तेलम
शेतकरी ( केवनाळा )
नागली आणि भाता साठी भरपुर आणि संततधार पाऊस असल्याशिवाय लावणी करता येत नाही. शेत निखळ कोरडीठाक पडली आहेत. अशा परिस्थितीत आम्ही लावणी कशी करायची?
भाऊ झुगरे
शेतकरी ( सायदे )
याबाबत मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य प्रदीप वाघ यांनी शेतक-यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती पाहिली असून फारच गंभीर आहे. त्यामुळे कृषी विभागाने व जिल्हा प्रशासनाने संयुक्त पहाणी करुन शेतक-यांना जरुर ती मदत करण्याची मागणी केली आहे.