डोंबिवली ( शंकर जाधव ) : वाढत्या कोरोनाच्या महामारीत सारा देश होरपळून निघाला असताना जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशात दारात आलेले अव्वाच्या सव्वा वीज बिल सामान्य जनतेची गळचेपी करीत आहे, गेली अनेक दिवस मराठी भारती संघटना या विरोधात लढत आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक विभागात हे आंदोलन करण्यात आले, त्यात लोकांनी विजबिलाबद्दल आपला जो काही रोष आहे तो मांडला असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा ऍड. पूजा बडेकर यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन मुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत , हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाची उपासमारीने जीव जायची वेळ आली असता त्यांच्या उपजीविकेचा मूळ प्रश्न असणाऱ्या लोकांनी ऊर्जा खात्याने थोपवलेले वीज बिल भरावे कसे ? हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकाला पडला आहे.
सामान्य नागरिक हे अव्वाच्या सव्वा आलेले वीजबिल नाही भरू शकत.. त्यामुळे सरकारने ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ झाले पाहिजे, तसेच १ एप्रिल २०२० रोजी झालेली विजदरवाढ रद्द झाली पाहिजे.. ह्यासाठी मराठी भारती संघटनेने आज महाराष्ट्रात ठीक ठिकाणी लोकांच्या आक्रोशाला वाचा फोडली असून लोकांसह वीज बिल जाळून विजबिलाची होळी केली ! त्यावेळी नागरिकांनी वीज बिलाने वाढविलेला असंतोष व्यक्त केला. जोगवा मागून पोट भरणाऱ्या वर्गाला आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले, आमच्या डोळ्यातलं पाणी सरकार ला दिसत नाही का ? असा सवाल मराठी भारतीच्या अध्यक्षा पूजा बडेकर यांनी विचारला.
लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या कार्यध्यक्षा विजेता भोनकर यांनी दिला आहे.महाराष्ट्रात मुंबई, कल्याण, भिवंडी,विरार, नालासोपारा, पालघर, शिवडी , रेरोड, घाटकोपर,नेरुळ, उल्हासनगर, हिंगोली, सोलापूर, पुणे, भोर या अनेक विभागांमध्ये विजबीलाची होळी करण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी आशिष गायकवाड, राकेश सुतार,अनिल हाटे यांनी वेगवेगळ्या विभागांचे नेतृत्व केले असल्याचे प्रवक्ता सोनल सावंत यांनी म्हटले आहे.