कल्याण : रस्ते विकास महामंडळामार्फत कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्री पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. रस्ते विकास महामंडळामार्फत कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्री पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. बांधण्यात येणाऱ्या नव्या पत्री पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी मोठी क्रेन पत्री पुलाच्या बाजूला आणण्यात येणार असून आजपासून 24 ऑगस्टच्या रात्री दहा ते पहाटे पाच या कालावधीत पत्री पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहनांनाही बंदी घालण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणवरून पत्री पूलमार्गे शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना राजणोली नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांना जनोली नाका येथून राष्ट्रीय महामार्ग 3 वरून खारेगाव टोलनाका-मुंब्रा बायपासमार्गे पुढे जावे लागणार आहे. त्याचबरोबर कल्याण-शिळफाट्याकडे जाणाऱ्या मध्यम आणि हलक्या वाहनांना दुर्गामाता चौकात बंदी घालण्यात आली असून या वाहनांनी चौकातून डाव्या बाजूने आधारवाडी चौक, खडकपाडा चौक, भवानी चौक, प्रेम ऑटो सर्कल, सुभाष चौक, वालधुनी रेल्वे ब्रिजवरून जावे लागणार आहे. दरम्यान, 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरु होणार असल्याने खरेदीसाठी नागरिकांची बाजारात ये-जा सुरु होणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस ही ‘कोंडी’ कशी फोडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.