मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात अधूनमधून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी सातही धरणांत ८२ टक्के पाणीसाठा जमा आहे. यामुळे मुंबईत सुरू असलेले २० टक्के पाणीकपातीचे संकट लवकरच दूर होणार आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. आज सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणांत ८२.९५ टक्के म्हणजेच १२ लाख ६४२ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये आजच्याच दिवशी ९४.२० टक्के म्हणजेच १३ लाख ६३ हजार ४०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. आजच्याच दिवशी २०१८ मध्ये १२ लाख १८ हजार २२२ इतका म्हणजेच ९१.०८ टक्के पाणीसाठा जमा होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी धरणात पाणीसाठा कमी आहे.