अंबरनाथ दि. २० (नवाज अब्दुलसत्तार वणू) : अंबरनाथ शहर स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर रहावे याकरिता पालिका प्रशासनाकडून आजपर्यंत अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. संपूर्ण शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य ते नियोजन, घंटागाडी दारोदारी योजना, कचऱ्याचे रूपांतर खतामध्ये करण्यासाठी कार्यरत असणारे खत प्रकल्प, भुयारी गटार योजना, मलजल प्रक्रिया केंद्र यांसारख्या यशस्वी उपाययोजनांमुळे आणि शहरातील नागरिकांच्या सहभागामुळे नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संपूर्ण देशातून अंबरनाथने १८ वा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अंबरनाथने ३० वा क्रमांक पटकावला होता. त्यांनतर एकाच वर्षाच्या कालावधीत शहराने शिस्तबद्ध उपाययोजनांमुळे देशात १८ वे आणि राज्यात ३ रे स्थान पटकावले आहे.
संपूर्ण शहरात पालिका प्रशासनाकडून घंटा गाडी दारोदारी हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे शहरात उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अगदी नाहीसे झाले आहेत. या योजनेमध्ये सर्व पालिकेचे सफाई कर्मचारी, महिला बचत गटातील महिलांनी देखील मुख्य भूमिका बजावली आहे. प्रत्येक घंटागाडीमागे दोन महिलांनी विभागा-विभागात जाऊन नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा याबाबत मार्गदर्शन केल्याने नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण झाली आहे. त्याच बरोबर शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, मुख्य रस्ते याठिकाणी स्वच्छतेला मोठे प्राधान्य दिले गेले. पालिका प्रशासनामार्फत आजपर्यंत प्रति घरामागे शौचालय उभारणीसाठी १५ हजार रुपये देऊन शहरात एकूण ४ हजार २०० खाजगी शौचालय उभारण्यात आले आहेत. याचेच एक यश म्हणून आज अंबरनाथ शहर हे एक हगणदारीमुक्त शहर म्हणून ओळखले जात आहे. त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी असलेले सार्वजनिक शौचालयांचे नूतनीकरण करण्यात आले असून पॉवर स्प्रे मशीन द्वारे त्यांची स्वच्छता केली जात आहे. शहरातून निघणारे सर्व सांडपाणी, मलमूत्र हे भुयारी गटारांमध्ये सोडले जात असल्याने शहरात कोठेही सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता शहराचे एक मुख्य स्वच्छता दूत आणि संपूर्ण शहरात एकूण ८० स्वच्छता दूत कार्यरत आहेत. पालिका द्वारे संचलित सध्या शहरात एकूण ८ खत प्रकल्प कार्यरत असून त्याद्वारे आजपर्यंत सुमारे ८ ते १० टन खत निर्मिती करण्यात आली आहे.
शहर स्वच्छ राखण्यामध्ये पालिका प्रशासन ज्या पद्धतीने विविध उपायोजना राबवित आहे त्याच बरोबर शहरातील नागरिकांचे देखील यामध्ये एक मोठे सहकार्य लाभले आहे. शहरात असणाऱ्या शाळांनी आपल्या विदयार्थ्यांच्या मदतीने संपूर्ण शहरात स्वच्छतेचे महत्व सांगणारे अनेक उपक्रम देखील राबविले. स्वच्छतेवर आधारित पथनाट्य, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांसारखे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविले.
एकंदरीतच शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ.मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, माजी सभापती उत्तम आयवळे, माजी मुख्याधिकारी देविदास पवार, आरोग्य अधिकारी सुरेश पाटील सर्व माजी नगरसेवक यांनी शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे आणि सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन केलेल्या कामांमुळे अंबरनाथ शहराने आज संपूर्ण देशात स्वच्छतेच्या बाबतीत १८ वा आणि राज्यात ३ रा क्रमांक पटकावला आहे.
*अंबरनाथ शहराला मिळालेला हा राष्ट्रीय स्वरूपाचा सन्मान हा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बरोबरच अहोरात्र काम करणाऱ्या सफाई कामगार आणि या शहरातील प्रत्येक नागरिकाचा हा बहुमान आहे. स्वच्छता ही सेवा आणि संस्कार असून महाराष्ट्राच्या संत परंपरेची शिकवण आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आता स्वच्छ राहण्याबरोबरच निरोगी राहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याने स्वच्छ, सुंदर आणि निरोगी अंबरनाथ राखण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया.*
डॉ.प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी
अंबरनाथ नगरपरिषद