वृत्त प्रतिनिधी : संतोष पडवळ l दिनांक – १० सप्टेंबर २०२०
पुणे – ११ तोळे सोने, २५० ग्रॅम चांदी व २० हजार रोकड असलेली बॅग रिक्षात विसरून गेलेल्या प्रवाशाला परत करण्याचा दिलदारपणा घोरपडी गावातील एका रिक्षा चालक काकांनी दाखवला आहे. ही घटना बुधवारी (दि.९) दुपारी दीडच्या सुमारास घोरपडी येथे घडली.
विठ्ठल बजाबा मापारे (वय ६०, रा. आदर्श पार्क, घोरपडी, पुणे) असे या दिलदार रिक्षा चालक काकांचे नाव आहे.
मापारे यांच्या रिक्षामध्ये केशवनगर मुंढवा येथे दुपारी दीडच्या सुमारास खुदुस मेहबुब शेख व त्यांची पत्ती शहनाज शेख रिक्षात बसले. गाडीतळ बसस्टॉप याठिकाणी त्यांना सोडून मापारे यांनी त्याची रिक्षा बी.टी.कवडे रोड पामग्रोव्हज रिक्षा स्टॅन्ड येथे आणून रांगेत लावली.
मापरे चहा पिण्यासाठी बाहेर गेले ते चहा पिऊन मागे आल्यानंतर त्यांना रिक्षा सीटच्या मागे एक बॅग दिसली. संबंधित बॅग ही अगोदरच्या प्रवाशाची असावी असा संशय आल्याने त्यांनी त्याचठिकाणी प्रवाशाची १ ते २ तास वाट पाहिली.
साडेतीनच्या सुमारास मापारे यांनी घोरपडीगाव चौकीला जाऊन बॅग रिक्षामध्ये विसरल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनला याबाबत संपर्क करुन बॅगबाबत माहिती देऊन कोणी विचारण्यास आल्यास त्यांना घोरपडीगाव पोलीस चौकीस संपर्क करण्यास सांगितले.
एका तासात नियत्रण कक्ष पुणे शहर यांचा घोरपडीगाव मार्शल यांना बॅग रिक्षामध्ये विसरल्याबाबत फोन आला व संबंधित प्रवासी यांचा मोबाइल नंबर प्राप्त झाला. त्या प्रवाशांना फोन करुन घोरपडीगाव पोलीस चौकी येथे येण्यास सांगितले.
प्रवासी पती-पत्नी चौकीला आल्यानंतर त्यांना ११ तोळे सोने, २५० ग्रॅम चांदी व २० हजार रोकड असलेली बॅग परत करण्यात आली. प्रवासी पती-पत्नी यांनी रिक्षा चालक व पोलिसांचे आभार मानले. कलियुगाच्या काळात असा दिलदारपणा विरळाच.