डोंबिवली (प्रतिनिधी ) : डोंबिवलीच्या एमआयडीसी निवासी विभागातील एका भंगारवाल्याच्या दुकानात बालकामगार काम करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अवदूत सावंत यांच्या निदर्शनात आले . सावंत यांनी सलाम बालक ट्रस्ट या ठाणे जिल्हा सिटी चाईल्ड हेल्पलाईनला या बाल कामगाराच्या सुटकेसाठी संपर्क साधला. सावंत यांच्या सतर्कतेमुळे मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी पोलिसांनी चाईल्ड हेल्पलाईनच्या समन्वयक श्रद्धा नारकर यांच्या फिर्यादीनुसार रामसुभक राजाराम चौहान ( ४८, रा. श्रीराम सदन सोसायटी, आजदे गाव) या दुकानदाराच्या विरोधात १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे माहीत असूनही अल्पवयीन मुलास त्याच्या रद्दीच्या दुकानात कामावर ठेवल्याच्या आरोपाखाली बाल न्याय (लहान मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी फौजदार प्रशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत .
सलाम बालक ट्रस्ट चाईल्ड लाईनच्या समन्वयक श्रद्धा नारकर यांनी सावंत यांना सदर मुलास स्थानिक मानपाडा पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. तो बालकामगार उत्तरप्रदेश राज्यातल्या ग्राम हलवा, पोस्ट बेलपरिया, थाना गौर हरिया बस्ती येथिल राहणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर रद्दीच्या दुकानात मजूरी करत असल्याचेही त्याने पोलिसांनासांगितले. सदर मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापूर्वी उल्हासनगर – ५ येथिल बाल कल्याण समितीसमोर हजर करुन त्याला तेथिलच शांतीभवन या शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले.