ठाणे :- राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बंधने पाळून कोरोनाची महामारी नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी घोषित केलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम आजपासून ठाणे शहरात राबविण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी केले आहे. संपूर्ण राज्यात दिनांक १५ सप्टेंबरपासून ही मोहिम राबविण्यात येत असून अनलॉक प्रक्रिया सुरु असताना, जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच कोविडचा वाढता प्रादुर्भाव अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेतंर्गत ठाणे शहरातील सर्व लोकसंख्येला २ वेळा गृभेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्त्वाच्या अति जोखीम गटात असणाऱ्या व्यक्ती शोधून काढणे व त्यांची काळजी घेणे यावर भर असणार आहे. त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण व गरोदर मातांवर वेळीच उपचार याचा अंतर्भावही या योजनेत करण्यात आला आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’या मोहीम कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीस आरोग शिक्षण व कोविड प्रतिबंधाचे संदेशही देण्यात येणार आहेत. कोविड – १९ साथीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहीमेस मंत्रिमंडळाच्या दिनांक ०६.०९.२०२० रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून सदरची मोहिम महापालिकेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने आणि समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेबर ते १० ॲाक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून या टप्प्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रतिनिधी किंवा आशा वर्कर्स आणि दोन स्थानिक स्वयंसेवक हे त्या त्या विभागातील प्रत्येक नागरिकांच्या घरी भेट देवून त्यांचा प्राणवायू तपासणे, तापाची नोंद घेतील. तसेच कोविडचा संशय वाटल्यास त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करतील. त्याचबरोबर मधुमेह, ह्रदयविकार, किडनी आदी आजार असलेल्या अति जोखीम गटातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. मोहिमेचा दुसरा टप्पा १४ ॲाक्टोंबर ते २४ ॲाक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या फेरीमध्ये पुन्हा कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती, त्यांचा प्राणवायूची व तापाची तपासणी करून कोणाला काही आजार होवून गेला आहे का याची माहिती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्या गृहभेटीच्यावेळी गैरहजर असणा-या लोकांची तपासणी करून घेण्यात येणार आहे.