ठाणे दि. 14 :- “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहिम शासनाने हाती घेतली आहे. प्रत्येक घरा-घरातील अबाल वृद्धांपर्यंत आरोग्य सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात यावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तींने या मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे, तसेच शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गजन्य असल्याने बाधितांची वाढती संख्या दुर्लक्षून चालणार नाही. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाच्या जबाबदार वर्तनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही.
“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय व शहरात, महानगरात वार्ड निहाय पथके स्थापन करण्यात आली असून या पथकातील सदस्य घरो-घरी जाऊन प्रत्येकांची आरोग्यविषयक चौकशी करतील. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. हे पथक घरातील सर्व सदस्यांचे तापमान (SpO2) तपासणी व घरातील सदस्यांची इतर आजार आहे का याची माहिती घेतील.
आपण सर्व जिल्हावासियांच्या सहकार्याने मोहीम परिणामकारकरित्या राबवुया आणि कोरोनाविरुद्धचा लढा जिंकुया असा विश्वासही श्री शिंदे यांनी व्यक्त केला.
या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत आणि दुसरा टप्पा 14 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व विभागांचा योग्य तो समन्वय साधला गेला असून स्थानिक स्वयंसेवक यासाठी पुढे येऊन सर्वांच्या आरोग्या सुरक्षितेच्यादृष्टिने आपआपले योगदान देतील अशी अपेक्षाही पालकमंत्री यांनी व्यक्त केली आहे.