दिड वर्षे खोळंबले काम
ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
काम मार्गी लावणार
पालकमंत्र्यांची ग्वाही
मोखाडा ( दीपक गायकवाड ) : मोखाडा तालुक्यातील चास ग्रामपंचायत हद्दीतील हिंबटपाडा येथील पुल तब्बल दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. दुसरा मार्ग नसल्याने येथील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून येथूनच प्रवास करावा लागत आहे. याबाबत मोखाडा पंचायत समितीचे सदस्य व माजी सभापती प्रदीप वाघ यांनी आमदार सुनील भुसारा आणि पालकमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले असून पालमंत्रयांनी तातडीने कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.
प्रस्तुत पुल हा नदीवर बांधण्यात येणार असून मागील दिड ते दोन वर्षांपासून या पुलाचे काम हे केवळ निधी अभावी खोळंबलेले आहे. पर्यायाने येथील ग्रामस्थांना अनंत अडचणींशी सामना करावा लागत आहे. पावसाळ्यातील दळणवळण जिकीरीचे झाले आहे. रुग्णांना तालुक्याच्या गावी घेवून जातांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.परंतू बांधकाम प्रशासन त्या बाबत कमालीची दिरंगाई करीत असल्याने येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांचे कडे अडचण मांडली त्यानुसार आमदार सुनील भुसारा आणि पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या कडे वाघ यांनी हिंबटवाडी ग्रामस्थांची अडचण मांडल्यानंतर उभय नेत्यांनी याबाबत सकारात्मक भुमीका घेतली असून लवकरच प्रस्तुत काम पुर्ण होईल अशी ग्वाही दिली आहे.