त्यांच्या जाण्याने कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. तर देवळेकर यांच्या निधनाबाबत सर्वपक्षीय राजकारणी, लोकप्रतिनिधीनी शोक व्यक्त केला आहे. एलएनएन परिवाराकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांना श्रद्धांजली
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, राजेंद्र देवळेकर यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. धडाडीचे शिवसैनिक अशी ओळख असणारे देवळेकर या कोरोना काळातही अनेकांच्या मदतीला धावून गेले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास वाटचालीत त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा कार्यकर्ता, मनमिळावू लोकप्रतिनिधी गमावला आहे. ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
“अभ्यासू व्यक्तिमत्वं अकाली काळाच्या पडद्याआड”- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कार्यशील, अभ्यासू व्यक्तिमत्वं अकाली काळाच्या पडद्याआड गेलं आहे. कल्याण-डोंबिवलीतील नागरीकांना त्यांची उणीव सतत जाणवेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र देवळेकर यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शिवसेना या आमच्या सहयोगी पक्षाचे कल्याण-डोंबिवली शहरातील नेते, नगरसेवक असलेले राजेंद्र देवळेकर लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. गेल्या काही वर्षात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक असून या दु:खातून सावरण्याचं बळ त्यांच्या कुटुंबियांना व सहकारी कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
“कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राचे देवळेकर यांच्या जाण्याने अतोनात नुकसान” : विश्वनाथ भोईर-आमदार,कल्याण(प)
डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर माझे सहकारी राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाले आहे. देवळेकर म्हणजे कोहिनूर हिरा होते हिरा आपल्या कल्याण शहराचेच नव्हे तर समस्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राचे देवळेकर यांच्या जाण्याने अतोनात नुकसान झाले आहे. एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. कोरोना काळात जनसामान्यांकरिता न थकता जीवाची पर्वा न करता त्यांनी लोकांसाठी स्वतःला झोकून देऊन काम केले. आपल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघावर यंदा प्रथमच भगवा फडकवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता..अत्यंत अभ्यासू,हुशार,प्रशासनावर पकड असलेला, जनसेवेकरिता सदैव तत्पर, सुस्वभावी, मनमिळाऊ देवळेकर आज आपल्यात नाहीत यावर माझा अद्यापही विश्वासच बसत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच देवळेकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती प्रदान करो.