जिल्हा परिषदेचे उप मुख्य लेखा व वित्ताधिकारी मयूर हिंगाणे यांचा अनोखा उपक्रम
ठाणे दि. २४ सप्टेंबर : ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. मयूर मल्लिकार्जुन हिंगाणे यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस वृक्षारोपण करीत व प्रत्येक वर्षी १०१ झाडे लावण्याचा संकल्प करीत पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत अनोख्या पद्धतीने साजरा केला. याप्रसंगी वाढदिवसासाठी ‘जंगल थीम’ चा वापर करून एकूणच पर्यावरणाचे घटक म्हणून झाडे आणि पशु-पक्षांचे असणारे महत्व अधोरेखित केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या कार्यक्रमावर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. याप्रसंगी बोलताना श्री. हिंगाणे म्हणाले की , ‘सद्यस्थितीत सबंध मानवजातीसमोरच पर्यावरणाच्या ढासळलेल्या समतोलाच्या रूपाने अतिशय गंभीर आव्हान उभे राहिले आहे. मागील कित्येक दशकांपासून माणसाने पर्यावरणाचा वापर केवळ आपल्या फायद्यासाठी केलेला असून त्याच्या संतुलनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा राहिला असून आपण सर्वच जण सध्या ‘बोनस’ वेळेवर जगतो आहोत याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.
नुकत्याच ओढवलेल्या कोरोनाच्या संकटाचा सुद्धा एका प्रकारे पर्यावरणाच्या सातत्याने होणाऱ्या ऱ्हासाशी संबंध असून अशा प्रकारची याहून अधिक मोठी आव्हाने यापुढील काळात सामोरी येतील असा गंभीर इशारा विविध आंतरराष्ट्रीय संघटनांनाही दिला आहे. इथून पुढील काळात पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी योग्य पावले उचलली तर ‘डॅमेज कंट्रोल’ निश्चितपणे करता येईल. संकट कितीही मोठे असले तरी सर्व काही हाताबाहेर गेले आहे असे अजिबात नाही. याउलट एकूणच पर्यावरणाच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्याची सर्वांगीण विकासाशी सांगड घालून अधिकाधिक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. यासाठी माझ्याकडून खारीचा वाट म्हणून मी येथून पुढे येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यात १०१ झाडे लावण्याचा व त्याची अभिनव पद्धतीने निगा घेऊन ती सगळीच्या सगळी जगविण्याचा संकल्प करीत आहे. मागील काही वर्षांपासून केंद्र व राज्य शासनाने हाती घेतलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना अभूतपूर्व यश मिळाले असून त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.’