डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना काळात रस्त्यावर गर्दी होऊन नये पालिका प्रशासन एकीकडे काम करत दुसरीकडे फेरीवाल्यांना आंदन दिल्याचे दिसत आहे. तोंडावर मास्क घालता भाजी विक्रेते आणि भाजी घेण्यासाठी होणारी गर्दी यामुळे शहरात कोरोना कसा आटोक्यात आणणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. डोंबिवली पूर्वेकडील ९० फीट रोडवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असल्याच्या अनेक लेखी तक्रारी आल्यावरही या फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त व्यक्त होत आहे. याला परिस्थितीला `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकाचे दुर्लक्ष केल्याचे यावरून दिसत आहे.याबाबत भाजप नगरसेवक साई शेलार यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्व येथील ९० फीट रस्त्यावर सकाळी ५ ते ११ या वेळेत भाजी, फळे, फुले विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सुरूवातीला फेरीवाल्यांवर कारवाई का केली नाही याबाबत अधिकाऱ्यावर कारवाई केली होती. कोरोना काळातहि फेरीवाल्यांची संख्या वाढली असून सोशल डिस्टन्सिंग पाळणे , मास्क लावणे या नियमांना देखील या फेरीवाल्यांनी हारताळ फासला आहे. यासंदर्भात नागरिकांनी पालिकेला निवेदन दिले आहे. पालिका दुर्लक्ष करत असून पालिका अधिकारी आणि फेरीवाले यांची मिलीभगत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोंबिवली रेल्वेस्थानकावरील स्कायवॉक येथे हाणामारी झाली होती. त्यानंतर आमदार रविंद्र चव्हाण यांनी तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांना फेरीवाले आवरता येत नसतील तर बदली करू घ्या अशा शब्दात दरडावले होते. त्यानंतर काही दिवसांनी आयुक्तांची बदली झाली आणि रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांची पालिका आयुक्तपदी नेमणुक झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली. सद्यास्थितीत संचारबंदीचे नियम शिथील झाल्यामुळे फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान बसवण्यास सुरूवात केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक घरकाम करणाऱ्या नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे या महिलांनी देखिल भाजी विक्रीसारखे अनेक उद्योग सुरू केले असून या सर्वच महिला रस्त्याच्या कडेला भाजी विक्रीसाठी बसतात. त्यामुळे डोंबिवली पूर्वेकडी फडकेरस्ता, मानपाडा रस्त्याजवळील गावदेवी मंदीर, ९० फीट रस्ता येथे फेरीवाल्यांचा वावर वाढला आहे.
९० फीट रस्त्यावर फेरीवाले बसत असल्याने वाहतुक कोंडीची समस्या वाढली आहे. इतकेच नव्हे तर कोरोनाच्या पाश्र्वाभूमीवर जे नियम पाळणे आवश्यक आहे त्या नियमांचा भंग होताना दिसून येत आहे. यासंदर्भात या परिसराच्या आजुबाजुच्या सोसायटीतील नागरिकांना देखील त्रास होत असून अनेकवेळा पालिकेकडे निवेदन सादर केले असल्याची माहिती भाजपचे डोंबिवली पूर्व अध्यक्ष राजु शेख यांनी दिली.भाजपचे नगरसेवक साई शेलार यांनी प्रशासनाला निवेदन देऊन सदर ठिकाणी अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाने स्कायवॉकवर बसणाºया फुलवाल्यांवर रोज कारवाई केली जात आहे इतकेच नव्हे तर दोन दिवसात ९० फीट रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई होत असल्याचे सांगितले.