मुंबई (संतोष पडवळ ) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ६ ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन तर १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची शक्यता दिसत आहेत.
१० तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद
कोल्हापुरात आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन समितीचे आबा पाटील यांनी हा इशारा दिला. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण मिळालेले थांबले. राज्य सरकारला येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तो पर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १० तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी दिला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका बाहेर येत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्यावा, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
बंदला हिंसक वळण लागले तर सरकारच जबाबदार
मराठा आंदोलकांनी १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. हा बंद शांततेत करण्यात येईल. कुणीही त्या दिवशी दगडफेक करू नये, असं आवाहन मराठा आरक्षण संघर्ष समितीने केलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. बंद दरम्यान काही महामार्ग अडवले जातील. रास्तारोको केला जाईल. पण बंदला हिंसक वळण लागले तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असेही ते म्हणाले.
अशा आहेत मराठा समाजाच्या मागण्या
तसेच १० तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद राहणार आहे यासाठी राज्यभरात दौरा सुरु आहे. EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा आणि समाजातील तरुणांवर दाखल झालेले बोगस गुन्हे रद्द करा. या तीन गोष्टी सरकारने मान्य केल्या तर कदाचित १० तारखेच्या बंदवर विचार करू अन्यथा १० तारखेला राज्यभरात बंद पाळला जाईल, हा कडकडीत बंद होण्यासाठी समाजात जाणार असल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितले.