अधिकृत मच्छी मार्केटसाठी भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे मागणी.
ठाणे : दिव्यातील सर्व स्थानिक मच्छी विक्रते मागील २५ ते ३० वर्षापासून दिवा स्टेशन लगत असलेल्या तलावा शेजारी रस्त्यावरच मासे विक्री चा धंदा करत आहेत. दिवा विभागात मासे विक्रीसाठी महापालिकेचे कोणतेही अधिकृत मच्छी मार्केट नाही. यामुळे सर्व स्थानिक मच्छी विक्रेत्या महिलांनी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील व भाजपा दिवा शहर अध्यक्ष अँड.आदेश भगत यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यानंतर भाजपा दिवा विभागाच्या वतीने हा विषय आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे मांडण्यात आला. आज सर्व मच्छी विक्रेत्या महिलांनी भाजप पक्ष कार्यालयात जाऊन आमदारांची भेट घेतली. यावेळी ठाणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील, भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष अँड.आदेश भगत, महिला मोर्चा अध्यक्ष सौ अर्चना पाटील, मंडळ उपाध्यक्ष अंकुश मढवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दिवा विभागातील सर्व स्थानिक महिला मच्छी विक्रेत्या गेल्या अनेक वर्षांपासून अधिकृत मार्केट च्या मागणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे आणि ठाणे महानगरपालिकेकडे मागणी करत आहेत परंतु आज तागायत स्थानिक मच्छी विक्रेत्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही उलट वर्षानुवर्षे टोलवाटोलवी केली जात आहे. परिणामी सर्व मच्छी विकणाऱ्या स्थानिकांना ऊन-पाऊसात बसून धंदा करावा लागत आहे. सर्व शहरांमध्ये हक्काचं मार्केट असत पण दिवा शहर याला अपवाद आहे. परिणामी स्थानिक भूमिपुत्र मच्छी विक्रेत्यांना आपल्या हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे.
दिव्याच्या मच्छी मार्केट चा विषय मार्गी लावण्यासाठी लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित महिला मच्छी विकर्त्यांना सांगितले.