लोणावळा : लोणावळा शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांचा आज भरचौकात गोळ्या घालून खून करण्यात आला. या घटनेनंतर लोणावळा शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहरातील जयचंद चौक याठिकाणी असलेल्या येवले अमृततुल्यजवळ वरील घटना घडली. या ठिकाण हे राहुल शेट्टी यांच्या घराच्या अगदी जवळच आहेत. शेट्टी हे येवले अमृततुल्य या दुकानाबाहेर उभे असताना एका अज्ञाताने त्यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडून तसेच त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून पसार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटना घडल्यानंतर राहुल शेट्टी यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान ही पूर्ववैमनस्यातून घडली असल्याची चर्चा असून लोणावळा शहर पोलिसांना या घटनेचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ हाती आले आहे. त्याद्वारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. आरोपींना तातडीने पकडून त्यांच्यावर सर्वप्रथम मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय अधिकारी, उपाधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिली.
हनुमान टेकडीवर युवकाचा खून तत्पूर्वी या घटनेच्या काही तास आधीच रविवारी रात्री 10.30 वाजता लोणावळा शहरातील हनुमान टेकडी याठिकाणी एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. या घटनेत आपापसात झालेल्या भांडणात गणेश नायडू नावाच्या युवकाचा देखील धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला आहे. या घटनेमधील एक आरोपी रुग्णालयात उपचार घेत असून, दुसरा आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.