ठाणे, ता 27, संतोष पडवळ : अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांत कोकण विभागात राबवलेल्या ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह’मध्ये मावा, खवा, तेलासह इतर असा एकूण ४२ लाख ९४ हजार रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच चाचणीसाठी अन्न पदार्थांचे २५९ नमुनेही घेतले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सण, उत्सवाच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. सणामध्ये विविध अन्नपदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. अशावेळी अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. हे भेसळयुक्त पदार्थ खाऊन आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी दुकाने किंवा उत्पादनाच्या ठिकाणी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करतात. संशयावरून अन्न पदार्थांचा साठाही जप्त केला जातो. शिवाय, संबंधित दुकान किंवा तेथील परिसर सील करून उत्पादन किंवा विक्री थांबवण्याची नोटीस बजावली जाते. भेसळीचा प्रकार असल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येत असून चाचणीसाठी अन्न पदार्थांचे नमुनेही घेतले जात आहेत.
एफडीएच्या कोकण विभागाने गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी, अर्थात २० ऑगस्टपासून फेस्टिव्हल ड्राइव्हला सुरुवात केली होती. नवरात्रोत्सवापर्यंत चालू असलेल्या या ड्राइव्हमध्ये ४६२ किलो खवा, मावा जप्त करण्यात आला असून याची एकूण किंमत ८९ हजार १२४ रु. आहे. एकूण पाच नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. तसेच तेल, तूपासह अन्य असा एकूण ४० लाख ३८ हजार ८८६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर ६४ नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. मिठाईचे ३६ नमुने घेण्यात आल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी दिली. याशिवाय इतर पदार्थांचा एक लाख ६६ हजार ७२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १५४ नमुनेही घेण्यात आले आहेत.