मुंबई, दि. 31 : माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखत देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचं नेतृत्व, कर्तृत्व, त्याग, बलिदानाचं योगदान सर्वाधिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली.
स्वर्गीय इंदिराजींच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात व स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत इंदिराजींनी दिलेले योगदान, केलेल्या त्यागाबद्दल देशवासीय त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहतील. इंदिराजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. तुरुंगवास भोगला. पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासाचा पाया भक्कम केला. आशियाई खेळांचं आयोजन असो की, अलिप्त राष्ट्रांचं नेतृत्व करण्याची क्षमता, इंदिराजींच्या अनेक निर्णयांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा गौरव वाढवला. देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमत्वासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.