डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकार सोशल डिस्टेंसिंग, तोंडावर मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझर करा असे वारंवार सांगतात. परंतु सरकारी कार्यालयातच या नियमांचे उल्लंघन होत असल्याच दिसते.`फ` आणि `ग` प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने सरकारी नियमांना किती महत्व दिले जाते हे यावरून सिद्ध होते.डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात विवाह नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांकडून सोशल डिस्टेंसिंगचे पालन होत नसल्याचे पाहूनही अधिकारी आणि कर्मचारी लक्ष देत नाही.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात विवाह नोंदणीसाठी नवविवाहित जोडपे विवाह नोंदणीच्या कामासाठी येत असतात. आठवड्यातून दोन दिवस या कामासाठी पालिकेने वेळ दिला असल्याने येथे नवविवाहितांची गर्दी होते. कोरोना काळात संक्रमण होवू नये म्हणून प्रत्येकाने सोशल डिस्टेंसिंग पाळून काम करणे बंधनकारक असूनही पालिका अधिकाऱ्यांना या गोष्टीचा विसर पडला असल्याचे स्पष्ट होत आहे. नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या घोळक्यात लहान मुलांचा वावर असल्यामुळे अशा वागणुकीमुळे लहान मुलांचीही होरपळ होत आहे.डोंबिवली विभागीय कार्यालयातील आठवड्यातील पहिल्या बुधवारी माहितीसह अर्ज सादर करून घेतला जातो. आणि दुसऱ्या आठवड्यात विवाह नोंदणी दाखला दिला जातो. दरम्यान या काळात दोन्ही बाजूकडील साक्षीदार म्हणून पालकवर्ग उपस्थित असतात. कोरोना काळात सरकारी कार्यालयात सॅनिटायझर आणि योग्य अंतरसाठी व्यवस्था करणे अपेक्षित असून अशा पद्धतीची व्यवस्था डोंबिवली विभागीय कार्यालयातील विवाह नोंदणी कामासाठी केलेली दिसून येत नाही. नवविवाहित जोडप्यांबरोबर इतर नातेवाईक गर्दी करीत असल्याने कोरोना संक्रमणाचा विसर पडत आहे. याबाबत प्रभाग क्षेत्र अधिकारी स्नेहा करपे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.मात्र `फ` प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी सांगितले कि, `फ`विभागात रोज तीन विवाह नोंदणी कामे जात असल्याने गर्दी होत नाही.