कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणमधील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे जिल्ह्यातील सर्व आमदारांची व खासदारांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर त्वरित मार्ग कसा काढता येईल यावर चर्चा केली.
या चर्चेत कल्याण शहरातील अनेक प्रश्नांबाबत आणि विकास कामांबाबत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी बैठकीत मुद्दे मांडले. कल्याण शहरातील वाहतूक कोंडी ही फार मोठी समस्या असून ही वाहतूक कोंडी टाळायची असल्यास कल्याण पश्चिम येथील महत्वाचा मार्ग असलेल्या दुर्गाडी चौक – सहजानंद चौक -छ.शिवाजी ते पत्रिपुल पर्यंत उड्डाणपूल बनवण्याची मागणी यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली. तसेच मुरबाड रोड, भवानी चौक ते वालधुनी विठ्ठलवाडी ओव्हर ब्रिज बाबतही मागणी यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली.
त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले दुर्गाडीच्या दुरूस्तीचे काम पुन्हा त्वरित सुरू करावे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी निधी मंजूर होऊन योजना सुरू करण्यात यावी. महत्वाचे जंक्शन असलेल्या आणि दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या आणि स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कामांना लवकर सुरुवात व्हावी. कल्याण शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणेबाबत मागणी केली.
बीएसयूपी योजनांमधून बधितांना घरे मिळावीत. मतदार संघातील बिर्ला महाविद्यालय परिसरात असणाऱ्या पोलिस वसाहतींचे पुनर्विकास करण्यात येऊन पोलिस व पोलिसांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा आदी प्रश्नांवर आमदार भोईर यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात यासाठी सविस्तर पत्रही दिले. या सर्व कामांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वतः जातीने लक्ष घालतील आणि कल्याणकरांना न्याय देतील, असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे.