मंदिरे सुरू करण्याची मागणी सातत्याने भाजपाकडून केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, मंदिरात गर्दी होते. मंदिरात आपण तल्लीन होऊन आरती, पूजा करतो. त्याठिकाणी एखादा पॉझिटिव्ह रुग्ण येऊन इतरांना कोरोनाची लागण देऊ शकतो. जगात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. राज्यात थंडी दरम्यान दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम नंतर आपल्याला भोगायला लागता कामा नये, म्हणून मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. मंदिरे उघडली तरी तोंडावर मास्क आणि सुरक्षित अंतर पाळावेच लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मी घराबाहेर पडत नाही. मी मंदिरे उघडत नाही, म्हणून माझ्यावर टीका होत आहे. माझ्यावर टीका केली जात असली तरी राज्याच्या हितासाठी मी टीका सहन करायला तयार आहे. उद्या यांचे ऐकून काही चुकीचे झाल्यास हेच लोक ‘तुमचे तुम्ही बघा’ असे बोलून बाजूला हटतील, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे नाव घेता केली.
जीएसटी आणि इतर परताव्याचे राज्य सरकारला 38 हजार कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त 5 ते 7 कोटी रुपये आले आहेत. असे असले तरी राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे पॅकेज घोषित केल्याचे सांगत केंद्र सरकार राज्य सरकारला आर्थिक मदत करत नसल्याचे निदर्शनास आणून भाजपाचे पितळ उघडे केले आहे.