सध्या सगळीकडे उत्साहाला उधाण आले आहे कारण आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी… जिला ‘सणांची सम्राज्ञी’ असेही म्हटले जाते तो दीपोत्सव साजरा होत आहे. सहा दिवसांचा हा उत्सव हर्षोल्हासात, आनंदात साजरा होत आहे. गेले आठ-नऊ महिने जे नकारात्मक आणि निराशाजनक वातावरण या करोना महामारीमुळे पसरलेले होते ते करोनाबाबत येणाऱ्या सकारात्मक बदलांमुळे ते बदलत चालले आहे आणि आयताच दिवाळीसारखा सण आल्यामुळे सर्वांना जणू हा मुहूर्तच मिळाला. गेले चार दिवस हा उत्सव अगदी आनंदात साजरा होत आहे, वातावरणात चैतन्य पसरले आहे, एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे, निराशेचा, नकारात्मक विचारांचा अंधकार दूर होत आशेचा, सकारात्मक विचारांचा प्रकाश या दिवाळीत सगळीकडे व्यापून राहिला आहे. गेले सात-आठ महिने मनावर आलेली मरगळ या दिवाळीच्या खरेदी, फराळ, साजरा करण्याचे मनसुबे यातच विरून जात नव चैतन्य संचारले आहे, ते अगदी दिवाळीच्या आधी पाच सहा दिवसांपासूनच दिसून येत होते.
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिवाळी साजरी करण्यासाठी एक नियमावली घालून दिली होती पण त्या नियमावलीचा जनतेने पुरता फज्जा उडवलेला दिसत आहे. वृत्तवाहिन्यांवर पाहिलेल्या बातम्यांवरून असे लक्षात येते की खरेदीसाठी बाजारात, शाॅपिंग माॅल, दुकाने यांत किती गर्दी होती, फूले, आकाशकंदील, दिवे, घर सजावटीसाठी लागणार्या वस्तूंच्या खरेदीसाठी नीट चालायलाही येत नव्हते इतकी गर्दी लोकांनी केली होती. यात कुठेही सामाजिक अंतर पाळलेले दिसत नव्हते, मास्क घालणाऱ्यांची संख्या अगदीच कमी होती, मास्क न घालताही लोक आरामात, बिनधास्त मार्केटमध्ये वावरताना, खरेदी करताना दिसत होते, वारंवार हात स्वच्छ करणे वगैरे तर मग दूरचीच गोष्ट. सूचना करूनही लोकांनी त्याचे पालन केले दिसत नव्हते. फटाक्यांच्या विक्रीला, त्यांच्या दुकानांवर बंदी घातली होती पण धनतेरसच्या संध्याकाळी, नरकचतुर्दशीच्या पहाटे, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर संध्याकाळपासून ते मध्यरात्री १२ वाजल्यानंतर १-२ वाजेपर्यंत फटाके फोडणे चालू होते. फटाक्यांचे आवाज ऐकायला येत होते, दूरवर आकाशात शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी दिसत होती दुकाने बंद झाल्यावर त्यांचे लक्ष्मीपूजन, वहीपूजन आटोपून पहाटेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी, मोठमोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या माळा लावणे यात आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांचा जराही विचार केलेला दिसून येत नव्हता ( तसा ते दरवर्षीच करीत नाहीत पण यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे). माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते फटाक्याच्या प्रदूषणामुळे करोना तसेच दमा, टीबी च्या रुग्णांना त्रास होतो, ते पुन्हा गंभीर आजारी होऊ शकतात तेव्हा फटाके फोडणे टाळा परंतु या आवाहनाला फाटा देऊन लोकांनी नेहमीप्रमाणेच फटाके फोडत दिवाळी साजरी केलेली दिसून येते. माझे कुटुंब माझी जबाबदारी याही विचाराचे गांभीर्य किती आहे हे यामुळे दिसून आले. यावेळी एक प्रश्न मात्र कायमच सतावत राहिला फटाक्यांचे स्टाॅल्स लावण्यास बंदी होती, विक्री करण्यास मनाई होती तर इतके फटाके या लोकांनी आणले कोठून???
सगळ्याच गोष्टी सरकारवर सोडून द्यायच्या नसतात तर प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी समजून वागावे लागते. प्रशासन नियम घालून देते ते आपल्या हितासाठीच असणार( निदान या आताच्या करोना काळात तरी) हे समजून न घेता, नियम न पाळता जो तो आपल्या मनाप्रमाणे, बेजबाबदार वागत राहतो. या अशा लोकांमुळेच करोना रुग्णांची संख्या आजही वाढतच आहे. सण, उत्सव आनंदासाठीच असतात, जीवनात रंग भरण्यासाठीच असतात पण या रंगाचा बेरंग होण्यास आपली एखादी चूकही कारणीभूत ठरते. त्यामुळे सध्याच्या काळात तरी उत्साहाच्या भरात आपण चूक तर करीत नाही ना, वाहवत तर चाललो नाही ना, आपल्यामुळे इतरांना त्रास तर होणार नाही ना याचे भान ठेवायला हवे.