शेलार चौक आणि आयरे भागात पोलिसांची नजर
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे तर्फे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी कंबर कसली आहे. पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हेगारी पार्श्वभूमी असून दोन किंवा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या 74 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. दिवाळी निमित्त पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी कायदा सुव्यवस्था विषयावर चर्चा केली.रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे घडणारे हॉटस्पॉट असलेली शेलारचौक, आयरे येथे विशेष लक्ष देणार असून या हद्दीत कायदा हातात घेणाऱ्या गुंडांना, टपोरी-टवाळ यांना वठणीवर आणणार आहे. या भागात पोलिसांची नजर असून गस्तही वाढविली जाणार आहे.
सचिन सांडभोर यांनी नुकताच डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांनी पत्रकारांची परिचय करून घेतला. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर वचक असावा आणि गुन्हेगारी नियंत्रणात यावी यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सचिन सांडभोर यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांची एक यादी तयार केली आहे. त्यानुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या 74 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले.