डोंबिवली (शंकर जाधव ) डोंबिवली रेल्वे स्थानक जवळील सरोज आर्केड इमारतीच्या मीटरबॉक्सला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मीटरबॉक्समधील सर्व मीटर भस्मसात झाले. मात्र या आगीत कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. तत्काळ एका तासात अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने वेळीच आगीवर ताबा मिळविला.
पूर्वेकडील प्रख्यात कामात मेडिकल हे औषधाचे दुकान सरोज आर्केड इमारती असून इमारतीत अनेक दुकाने आहेत. इमारतीच्या जवळच मधुबन, पूजा आणि टिळक सिनेमागृह असल्याने आगीची वार्ता समाजात गोंधळ होऊन वातावरण तंग झाले होते. परंतु शॉर्टसर्किटमुळे मीटरबॉक्सला आग लागल्याने ती आटोक्यात आणता आली असे अग्निशमनचे अधिकारी मारुती खिल्लारी यांनी सांगितले. इमारतीच्या तळमजल्यावर मारू अप्लायसेन्स नावाचे कटलरी दुकान असून त्या दुकानात भांड्यांचे गोडावून आहे. आगीत मारू अप्लायसेन्स दुकानाचा बोर्ड जळून खाक झाला असून मालाचे नुकसान झाले नसल्याचेही खिल्लारी यांनी सांगितले.
इमारतीचे सुमारे 15-20 इलेक्ट्रिक मीटर जळून खाक झाले असल्याने इमारतीतील वीजप्रवाह बंद पडला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहचल्याने आग तात्काळ नियंत्रणात आली.