महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई, दि. 28 : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला, शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांसाठी झटणारा लोकप्रिय नेता, एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि चांगला सहकारी गमावला आहे, या शब्दांत मसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आमदार भारत भालके यांचे निधन ही दुःखद घटना आहे. पंढरपूर- मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह त्या भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केले. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचे अविरत प्रयत्न सुरू होते. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणाऱ्या भारतनानांच्या निधनाने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची हानी झाली आहे, या शब्दात महसूलमंत्री श्री. थोरात यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.